
सामना ऑनलाईन । चेन्नई
सोशल मीडियात वादग्रस्त ठरलेल्या टिक टॉक अॅपवर अखेर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मद्रास उच्चन्यायालयाच्या मुदराई खंडपीठाने केंद्र सरकारला टिक टॉक डाउनलोडिंगवर रोख लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे टिक टॉकचा वापर आता हिंदुस्थानात करता येणार नाही.
देशातील तरुणांना, शालेय विद्यार्थ्यांना या टिक टॉकने भूरळ घातली आहे. मात्र सोशल मीडियाच्या नावाखाली अश्लील व्हिडीओ शेअर करण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर अनेक संघटनांनी या अॅपला विरोध केला होता. मुदराई खंडपीठाने बुधवारी केंद्र सरकारला टिक टॉक संबंधित काही महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. यामध्ये टिक टॉकचे डाउनलोडिंग आणि व्हिडिओ शेअरिंग तात्काळ बंद करण्यात यावे असे म्हटले आहे. टिक टॉकवरील व्हिडीओच्या माध्यमातून अश्लील आणि अनावश्यक मजकुर मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने असे निर्देश देण्यात येत असल्याचे मद्रास उच्चन्यायल्याने स्पष्ट केले.
























































