नगर येथील नेप्ती उपबाजार समितीचे खूनाच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या व्यक्तीच्या नावाने नामकरण करण्यात आले. हा निर्णय न्याय, नैतिकता आणि कायद्याच्या तत्वांचा सरळ अवमान आहे, असं म्हणत महाविकास आघाडीने या निर्णयाचा तीव्र निषेध केला.
एका दोषी गुन्हेगाराला सार्वजनिक संस्थेचे नाव देणे केवळ अमान्य आहेच. तसेच आपल्या समाजासाठी धोकादायक उदाहरण घालणारे आहे. नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या उद्घाटनात सहभाग घेतला. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करण्याचे आवाहन महाविकास आघाडीने प्रशासनाला केले आहे. सार्वजनिक संस्थांचे नाव अशा व्यक्तींवर ठेवले पाहिजे ज्यांनी समाजात सकारात्मक योगदान दिले आहे. नेप्ती उपबाजार समितीला एखाद्या प्रतिष्ठित स्वातंत्र्यसैनिक, समाज सुधारक किंवा स्थानिक व्यक्तिमत्वाच्या नावाने ओळख दिली जावी, ज्यांनी समाजाच्या हितासाठी नि:स्वार्थपणे कार्य केले आहे, अशी महाविकास आघाडीची मागणी आहे. प्रशासनाने या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा. त्याचबरोबर सर्व नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी या मानहानीकारक निर्णयाचा विरोध करण्यासाठी उभे राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीने केले आहे.