
महामुंबई कबड्डी लीग (एमकेएल) लवकरच अंतिम स्वरूपात कबड्डीशौकिनांच्या भेटीला येत आहे आणि या महास्पर्धेची चाचणी फेरी नुकतीच यशस्वी झाली आहे. महामुंबई कबड्डी लीग ही पहिल्या दिवसापासूनच चर्चेचा विषय ठरली आहे. विशेषतः देशातील नवोदित कबड्डीपटूंसाठी आगळी पर्वणी ठरावी अशा एमएमकेएलच्या चाचणी फेरीला प्रचंड प्रतिसाद देत 1800 हून अधिक खेळाडूंनी चाचणी फेरीत नोंदणी केली आणि 25,000 हून अधिक प्रेक्षकांनी या चाचणी फेरीचा आस्वाद ‘स्पोर्टवोट’ या ओटीटी ऍप वरून घेतला. चाचणीतच ही स्पर्धा सुपरहिट होणार याची खात्री संयोजकांना करून दिली.
महामुंबई कबड्डीच्या चाचणी फेरीच्या निकालावरून ऑक्शनसाठी निवडल्या जाणाऱया कबड्डीपटूंची यादी ठरणार असल्याने चाचणी फेरीत सर्व खेळाडूंनी जीव ओतला आणि त्यामुळेच रोमांचक असा खेळ प्रत्येक मॅचमध्ये बघायला मिळाला आणि प्रेक्षकांची उत्तम करमणूकही झाली आणि कबड्डी खेळ अधिकच रंगतदार झाला. या लीगकडे निश्चितच सगळय़ांची नजर आहे. कारण ‘माय टीम 11’ आणि ‘स्पोर्ट टायगर’ अशा मोठय़ा कंपनीने यात स्पॉन्सर म्हणून गुंतवणूक केली आहे. चाचण्यांची अंतिम फेरी पूर्ण झाल्यानंतर एमएमकेएल 23 जुलैला लिलाव फेरी आयोजण्यासाठी सज्ज आहे. निवडीची अंतिम फेरी ही लिलाव फेरी असणार आहे ज्यासाठी 800 हून अधिक खेळाडू चाचणी फेरीतून निवडण्यात आले. 800 खेळाडूंना त्यांच्या कामगिरीसाठी रेटिंगच्या आधारे तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे.
तंत्रज्ञानाने कबड्डीला आंतराष्ट्रीय स्वरूप देणार – सिद्धांत अगरवाल
आम्ही ‘स्पोर्टवोट’मध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली आहे त्याचा योग्यतो आणि पुरेपूर वापर करून कबड्डीला आणि कबड्डी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जा देता येईल. एमएमकेएलच्या चाचणी फेरीला मिळालेला प्रतिसाद पाहून आम्हाला ही खात्री आहे की, कबड्डी आणि कबड्डी खेळाडू हे डिजिटल स्वरूपाशी जुळवून घेण्यासाठी सज्ज आहेत. एवढेच नव्हे तर ते आतुरतेने अशा एखाद्या डेव्हलपमेंटची वाटच बघत होते. आता आम्हालादेखील ऑक्शन्सची आणि पुढील सिझनची उत्सुकता आहे. महामुंबई कबड्डी लीगची मुख्य स्पर्धा ऑगस्टमध्ये रंगणार आहे, असे ‘स्पोर्टवोट’चे फाऊंडर व सीईओ सिद्धांत अगरवाल यांनी स्पष्ट केले.

























































