
हिंदुस्थानी राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त, 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर अभिवादनासाठी देशभरातून लाखोंचा भीमसागर उसळणार आहे. या लाखोंच्या भीम अनुयायांसाठी महापालिकेने तात्पुरता निवारा, शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाईल चार्जिगची सुविधा, महिला आणि नवजात शिशूंसाठी हिरकणी कक्ष, थेट प्रक्षेपणाची सुविधा, मोठे एलईडी टीव्ही, सुरक्षेसाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबई महापालिका, पोलीस दल आणि अग्निशमन दलाकडून समन्वयाने काम केले जात आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि चैत्यभूमी या ठिकाणी करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचे नियोजन व अंमलबजावणी पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाद्वारे करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवायाची व्यवस्था महापालिकेच्या सहा शाळांमध्ये करण्यात आली आहे.
‘बाबासाहेबांच्या जागतिक पाऊलखुणा’चे प्रकाशन
मुंबई महापालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एक लाख प्रतींची सचित्र माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. मंगळवारी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पाऊलखुणा’ या सचित्र पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी जोशी, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर, उपायुक्त रमाकांत बिरादार आदी मान्यवर उपस्थित होते.
- चैत्यभूमी येथे शामियाना व व्हीआयपी कक्षासह नियंत्रण कक्ष
- नियंत्रण कक्षाशेजारी, तोरणा प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्गासह विविध 11 ठिकाणी रुग्णवाहिकेसह आरोग्यसेवा.
- एक लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा.
- शिवाजी पार्क परिसर तसेच रांगेतील अनुयायांसाठी फिरती शौचालये.
- पिण्याच्या पाण्याच्या नळाची व्यवस्था
- पिण्याचे पाणी असणाऱ्या टँकर्सची व्यवस्था.
- संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था, अग्निशमन दलामार्फत आवश्यक ती सेवा.
- महापालिकेच्या अधिकृत सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण.
- सीसीटीव्ही, एलएडी टीव्हीची व्यवस्था.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मोठय़ा संख्येने अनुयायी चैत्यभूमी येथे दाखल झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मैदान व आसपासच्या परिसरात देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने अनुयायी आले आहेत. त्यामुळे मुंबई पोलीस, रेल्वे पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात आली असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता तगडा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 67 वा महापरिनिर्वाण दिन उद्या बुधवारी आहे. त्यामुळे आपले मुक्तिदाते व राष्ट्रनिर्माते डॉ. आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात. यावेळीदेखील देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी कुटुंबकबिल्यासह शिवाजी पार्क मैदानात आले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनीदेखील चोख बंदोबस्त ठेवला आहे. शिवाय वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनीदेखील विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवली आहे.
असा असेल बंदोबस्तासाठी फौजफाटा
250 अधिकारी, दोन हजार कर्मचारी, एसआरपीएफच्या नऊ कंपन्या, क्यूआरटीच्या दोन तुकडय़ा, आरसीपी जवान, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन, बीडीडीएसची दोन पथके, छेडछाडविरोधी पथके, हरवणाऱ्या वृद्ध व लहान मुलांना शोधण्यासाठी पथके असा तगडा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. शिवाय समता सैनिक दलाचे 18 हजार जवानदेखील पोलिसांच्या सोबतीला तैनात असणार आहेत.

























































