विधान परिषद निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीला बंडखोरीचे ग्रहण!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात होणाऱया निवडणुकीत महाआघाडी आणि भाजप असा थेट सामना यावेळी होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या पुणे आणि संभाजीनगरमध्ये या दोन्ही पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.

त्यात युती आणि महाआघाडीचे घटक पक्ष असणाऱया रयत क्रांती आणि प्रहार या संघटनांचे उमेदवारही रिंगणात असल्याने दोन्ही पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.

पुणे पदवीधरसाठी भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने अखेरच्या क्षणी अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे समर्थक भैया माने यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेने प्रा. एन. डी. चौगुले यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे निवडणुकीतील चुरस अधिकच वाढली आहे. मागच्या वेळीप्रमाणे यावेळी बंडखोरीचा फटका बसू नये यासाठी राष्ट्रवादीकडून दक्षता घेतली जात आहे.

संभाजीनगर पदवीधरमधून भाजपने शिरीष बोराळकर यांना अधिपृतरीत्या उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक प्रवीण घुगे, बीडचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने बोराळकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रवादीने आमदार सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. ईश्वर मुंडे, महाआघाडीचे घटक पक्ष असणाऱया राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने सचिन ढवळे यांना येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे.

नाराजांशी संवाद साधू

मी नाराज नाही. कार्यकर्ते नाराज असतील तर त्यांच्याशी संवाद कसा साधायचा हे मला माहीत आहे. रमेश पोकळे किंवा प्रवीण घुगे यांना माझे समर्थक म्हणणे चुकीचे आहे. ते भाजपचे समर्थक आणि कार्यकर्ते आहेत. त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी शब्द टाकेन.

– पंकजा मुंडे, भाजप नेत्या

राष्ट्रवादीचा विजय निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निश्चित विजयी होतील. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अर्ज दाखल करणाऱयांची समजूत काढण्यात येऊन त्यांची उमेदवारी मागे घेण्यात येईल.

– जयंत पाटील, प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस