
कोरोनासाठीच्या चाचण्यांत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. कोरोना रुग्णांची संख्या, मृत्यू यातील काहीही सरकारकडून लपवले जात नाही. असे असताना अन्य राज्यांत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रॅली, प्रचारसभा, मिरवणुका सुरू आहेत. मात्र तिकडे कोरोनाचा कोणताच प्रादुर्भाव नाही का, तेथील आकडेवारी का समोर आणली जात नाही? कोरोनाबाबत महाराष्ट्राला बदनाम करण्याचा केंद्र सरकारचा डाव तर नाही ना, अशी शंका व्यक्त करीत आज मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मंत्रिमंडळ बैठकीत आज कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत राज्यात अनेक वेळा केंद्रीय पथक आल्याकडेही अनेक मंत्र्यांनी लक्ष वेधले. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडून वारंवार होत असलेल्या सूचनांबाबतही चर्चा झाली. मात्र हे सर्व महाराष्ट्रातच का केले जात आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामीळनाडू, पुडुच्चेरी या पाच राज्यांत निवडणुका आहेत. येथे निवडणूक प्रचाराचा मोठा धुरळा उडाला आहे. मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत असूनही तिथे कोरोना रुग्ण वाढत नाहीत का, असा सवाल या बैठकीत करण्यात आला. सरकार पारदर्शीपणे सर्व आकडेवारी मांडत असताना अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक टेस्ट करत असतानाही राज्य सरकारवरच कोरोना रुग्ण वाढीचे खापर फोडले जात आहे. हे बदनामीचे कारस्थान असून हे रोखण्यासाठी सरकारनेही पावले उचलायला हवीत, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
कोरानाचे निर्बंध अधिक कडक करा
अनेक जिह्यांत कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱयांनी कठोर पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचे निर्बंध अधिक कडक करा तसेच कोरोना लसीकरण मोठय़ा प्रमाणात करा, असे निर्देश दिले.
































































