
सावदा येथून जवळच असलेल्या रोझोदा येथे राहत्या घरात वृध्द दांपत्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना काल सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आणि गाव परिसरात घबराट पसरली. मात्र वरीष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कटाक्षाने तपासाची सुत्रे फिरवित पोलिसांनी फक्त 12 तासात हत्येचा छडा लावला. पोलिसांनी आरोपी परेश खुशाल भारंबे (वय – 35) याला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत त्याने डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी हत्या केल्याचे कबूल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोझोदा येथे सेवानिवृत्त ग्राम विस्तार अधिकारी, ओंकार पांडुरंग भारंबे (वय -90) त्यांची पत्नी सुमन औकार भारंबे (वय – 85) हे वृध्द दांपत्य राहात होते. त्यांच्या परिसरात काही दिवसांपूर्वी पासून कंटेनमेन झोन जाहीर करण्यात आले होते. नियमानुसार दररोज सकाळी डॉक्टर सहकारी येऊन तेथील नागरिकांना तपासणी करीत असत. या अनुषंगाने काल सकाळी डॉ. हारून काझी तपासणीसाठी आले असता भारंबे दांपत्याच्या घरातून कोणी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा डॉक्टरांनीच दरवाजा उघडला असता घरात वृध्द पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्यांना दिसले. याबाबत पोलीस पाटलांनी सावदा पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. एपीआय राहुल वाघ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पंचनामा केला.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक आणले असता श्वानाने आरोपी परेश ज्या शेतात होता तेथील मग काढला. पोलिसांनी परेशला शेतातून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपी परेश पोपटा सारखा बोलू लागला. माझ्यावर असल्याने कर्ज फेडण्यासाठी मी चोरी करताना दोघांची हत्या केल्याचे कबुल केले.
आरोपी हा वृध्द दांपत्याच्या घरा नजिकच राहात होता. त्यांचा सख्खाचुलत नातू असल्याचे गावकर्यांनी सांगितले. तो त्यांच्या घरातील कामेही करायचा. आरोपीने मध्यरात्री घरात प्रवेश केला. नोटांची काही बंडले घेऊन घरा बाहेर निघतांना वृद्ध दाम्पत्याला जाग आली. त्यांना रोखण्याच्या बेतात सुरीने सपासप वार केले, असे आरोपीने कबूल केले. तसेच रक्ताने भरलेले कपडे पोलिसांनी जप्त केले.

























































