
राज्य सरकारने परदेशातून आयात केल्या जाणाऱया मद्यावरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रातही इतर राज्यांप्रमाणेच इम्पोर्टेड स्कॉच आणि व्हिस्की स्वस्तात मिळणार आहे.
परदेशातून आयात केलेल्या स्कॉच आणि व्हिस्कीवरील एक्साईज डय़ुटी 300 वरून 150 टक्क्यांपर्यंत म्हणजेच 50 टक्क्यांनी कमी करण्यात येत असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आयात मद्याच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. इम्पोर्टेड मद्यावरील आयात शुल्क कमी केल्याने मद्य विक्रीत एक लाख बाटल्यांवरून 2.5 लाख बाटल्या इतकी वाढ होऊन महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढेल, अशी अपेक्षा एका वरिष्ठ अधिकाऱयाने व्यक्त केली.
बनावट दारूविक्रीला आळा बसणार
आयात मद्यावरील उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे इतर राज्यांतून होणारी स्कॉचची तस्करी आणि बनावट दारूच्या विक्रीलाही आळा बसणार आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सरकारला दारूपासून सर्वाधिक महसूल मिळतो. इम्पोर्टेड मद्याचे दर कमी झाल्याने विक्री वाढेल आणि अधिक महसूल मिळेल, असा दावा केला जात आहे.






























































