
नेहमीच वादग्रस्त विधाने करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सोलापुरातील पत्रकार परिषद संभाजी ब्रिगेडने उधळली. कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या अंगावर काळी शाई फेकून त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर सदावर्ते यांनी पत्रकार परिषद गुंडाळली. दरम्यान, सदावर्ते हे भाजपचे हस्तक आहेत. महाराष्ट्र तोडण्याची भाषा ते करत आहेत. परंतु त्यांचा कुटिल डाव यशस्वी होऊ देणार नाही, असे संभाजी ब्रिगेडने सांगितले.
स्वतंत्र मराठवाडय़ाच्या मागणीसाठी अॅड. सदावर्ते सध्या संवाद परिषद घेत आहेत. यानिमित्त सोलापुरात आज ते आले होते. यावेळी संभाजी ब्रिगेडने त्यांना हिसका दाखवला. सदावर्ते यांच्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले आहे, असा आरोप करत सदावर्ते यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.






























































