
सामना प्रतिनिधी । जळगाव
जिह्यातील भडगाव येथील माजी जि. प. सदस्य उत्तमराव महाजन यांचे खंडणीसाठी अपहरण करून त्यांना डांबून ठेवल्याप्रकरणी मुंबईच्या होमगार्ड विभागाचे पोलीस अधीक्षक तथा चाळीसगावचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ता धीरज येवले या दोघांना जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर या प्रकरणातील तिसरे संशयित आरोपी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विश्वास निंबाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
डॉ. उत्तम महाजन यांनी 30 जून रोजी फॅक्स पाठवून तत्कालीन पोलीस अधीक्षक संतोष रस्तोगी यांच्याकडे न्यायासाठी दाद मागितली होती. रस्तोगी यांनी चाळीसगावात अडीच दिवस मुक्काम ठोकून या प्रकरणात स्वत: जबाब नोंदविले. त्यानंतर चाळीसगावचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक मनोज लोहार, तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक विश्वास निंबाळकर, धीरज येवले यांनी माजी जि. प. सदस्य उत्तमराव महाजन यांना पोलीस ठाण्यात डांबून ठेकून 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जळगावच्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये या खटल्याची सुनावणी झाली. या खटल्यात संपूर्ण सुनावणीदरम्यान फिर्यादीसह एकूण 16 साक्षीदार न्यायालयात तपासण्यात आले. तत्कालीन संतोष रस्तोगी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

























































