
राज्यात 1440 नव्या डॉक्टरांची येत्या काही दिवसांत नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आणखी 600 डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात येत असून सुमारे 250 दंतचिकित्सकही आरोग्य विभागाची रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांसाठी उपलब्ध होतील अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
आरोग्य विभागाच्या महिला आरोग्य समिती, जन आरोग्य समिती आणि रुग्णकल्याण समितीच्या सदस्यांशी आरोग्यमंत्री आबिटकर यांनी ऑनलाइन पद्धतीने ‘जन आरोग्य संवाद’ साधला. आरोग्य समित्यांच्या बैठका नियमित होतात का, डॉक्टर वेळेवर उपस्थित राहतात का, डॉक्टरांचा रुग्णांशी योग्य संवाद होतो का आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक सेवा उपलब्ध आहेत का, याची थेट माहिती आरोग्यमंत्र्यांनी घेतली. आरोग्य समित्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सहा लाखांहून अधिक नागरिकांशी संवाद साधण्यात आला आहे. भविष्यात आणखी चार लाख नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेतल्या जातील असे त्यांनी सांगितले.
नागरिकांना तक्रारींसाठी ऑनलाइन पोर्टल
आरोग्य सेवांशी संबंधित तक्रारी आणि समस्या नागरिकांना थेट प्रशासनापर्यंत पोहोचविता याव्यात, यासाठी लवकरच ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याद्वारे नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

























































