
हिंदुस्थानची क्रीडा राजधानी ओडिशा (भुवनेश्वर) येथे नुकतेच झालेल्या पहिल्या ‘फिजिकल नॅशनल योगासन चॅम्पियनशिप’मध्ये महाराष्ट्र अव्वल विजेते राज्य ठरले, तर दुसरा क्रमांक तामीळनाडूने पटकावला. तिसरा क्रमांक गोवा राज्याने पटकावला. उपकनिष्ठ विभागात महिलांमध्ये महाराष्ट्राच्या तृप्ती डोंगरेने तर पुरुषांमध्ये त्याच गटात महाराष्ट्राच्या निबोध पाटीलने पदक पटकावले. कनिष्ठ महिला गटात महाराष्ट्राच्या स्वरा गुजरने, तर जय कालेकरने कनिष्ठ पुरुष गटात जेतेपद पटकावले.
प्रमुख पाहुणे म्हणून ‘ओडिशा हॉकी प्रमोशन कॉन्सिल’चे अध्यक्ष पद्मश्री दिलीप तिरकी उपस्थित होते. त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विजेत्यांचे आणि युवा हिंदुस्थानी खेळाडूंचे अभिनंदन केले. त्याशिवाय त्यांनी ‘एनआयएसएफ’चेसुद्धा त्यांच्या यशासाठी अभिनंदन केले. ओडिशा सरकारच्या क्रीडा आणि युवा सेवा विभागाचे आयुक्त आणि सचिव आर विनीत पृष्णा, ‘एनवायएसएफ’चे अध्यक्ष उदित शेठ, ‘एनवायएसएफ’चे सरचिटणीस डॉ. जयदीप आर्य, योगासन स्पोर्टस् असोसिएशन ऑफ ओडिशाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुधांशू अधिकारी, उमंग डॉन आणि डॉ. सस्मिता सामंता (केआयआयटी विद्यापीठ) हे मान्यवरसुद्धा यावेळी उपस्थित होते.


























































