
चार महिने काबाडकष्ट करून पिकवलेल्या भाताची कापणी केली आणि अचानक अवकाळी पावसाने तडाखा दिला. लागोपाठ दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतात पाणी साचले आणि कापून ठेवलेला भात पाण्यावर तरंगला. हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतल्यामुळे पालघर जिह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिह्यात बहुतेक ठिकाणी फक्त खरीपाच्या हंगामात शेती होते. वर्षातून फक्त भाताचेच पीक घेतले जाते. हेच पीक अवकाळी पावसात वाया गेल्यामुळे शेतकऱयांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. आता वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेने त्यांना ग्रासले आहे.
पालघर जिह्यात एक लाख पाच हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक 75 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र भातपिकाचे आहे. ग्रामीण भागात भात, नागली आणि वरई ही मुख्य आणि नगदी पिके घेतली जातात. भात आणि वरई या पिकांच्या धान्याची विक्री करून शेतकरी कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात, तर नागली आणि काही प्रमाणात भातपीक आपल्या रोजच्या उपजिविकेसाठी घरी ठेवतात. अतिदुर्गम मोखाडय़ात 13 हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे. येथे शेती हाच एकमेव मुख्य व्यवसाय आहे. शेती पिकावरच वर्षभराची गुजराण केली जाते. अवकाळीने पीकच हातून जाणार असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
प्रशासन अलर्ट मोडवर
मोखाडय़ात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची तातडीने माहिती घेण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकाऱयांना दिल्या आहेत. त्यादृष्टीने मंडळ कृषी अधिकारी ए. एल. साळुंखे यांनी कृषी सहाय्यकांना पिकांच्या नुकसानीची माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शेतकऱयांनी आपल्या पिकाच्या नुकसानीचे पह्टो काढून कृषी कर्मचाऱयांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पीक कुजून जाण्याची शक्यता
गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने खळ्यावर रचून ठेवलेले उडवे भिजले आहेत. त्यामुळे तेथील रचून ठेवलेले पीक कुजण्याची स्थिती निर्माण झाली आहे, तर शेतात कापून वाळत ठेवलेले पीक पाणी साचल्याने तेथेच तरंगू लागले. त्यामुळे शेतकऱयांच्या हाती आलेले पीक पूर्णपणे कुजून जाण्याची भीती आहे. आता नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱयांकडून केली जात आहे.
जव्हारमध्ये उडीद भिजला
जव्हार ः तालुक्यात मोठय़ा प्रमाणात उडीद, नागली आणि भाताचे उत्पादन घेतले जाते. सध्या मोठय़ा प्रमाणात भात आणि उडदाची काढणी शेतकऱयांनी केली आहे. हे पीक मळणीसाठी तयार असतानाच अचानक अवकाळी पावसाचा तडाखा बसला. या पावसाने दोन दिवस मुक्काम ठोकल्याने सुमारे 80 टक्के शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱयांना नुकसानभरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष नरेंद्र मुकणे यांनी केली आहे.

























































