
राज्यात कोरोनाचे 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून आज मध्यरात्रीपासून मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नागपूर येथील व्यायामशाळा, चित्रपट आणि नाट्यगृहे, जलतरण तलाव या महिनाअखेरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे दहावी व बारावीच्या परीक्षा वगळून शाळा-महाविद्यालयेदेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाला घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घेऊन कोरोनाचे संकट उंबरठ्यावरूनच परतवून लावू, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन करतानाच पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत, मात्र त्यांच्यामध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता राज्य शासनाने संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा 1897 (2) या कायद्याची अंमलबजावणी शुक्रवार, 13 मार्च 2020 च्या मध्यरात्रीपासून करण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेल, उपाहारगृहे, मॉल्स बंद करण्यात येणार नाही. त्याचबरोबर रेल्वे, बससेवा या अत्यावश्यक सेवेत येत असल्याने बंद करण्यात येणार नाही, मात्र नागरिकांनी गर्दी करण्याचे टाळावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
- नागपूरमध्ये कोरोनाचे आणखी 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून कोरोनाबाधितांची संख्या 3 झाली आहे. अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी नागपुरात आलेल्या एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते.
खंडोबाची सोमवती अमावस्या यात्रा रद्द
साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाची 23 मार्चला होणारी सोमवती अमावास्या यात्रा रद्द करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीमध्ये राज्यामध्ये पसरत असलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पालखी सोहळ्याबाबत विचारविनिमय करण्याबाबत पेशवेवाडा येथे बैठक पार पडली. सोमवार, 23 मार्चला सोमवती अमावास्या आहे. मात्र सूर्योदयानंतर दुसNया प्रहरात अमावास्येला प्रारंभ होत असल्याने पालखी सोहळा निघणार नाही.
कोरोना संशयितांसाठी पालघर, ठाण्यात स्वतंत्र इमारती; 24 तास डॉक्टरांची देखरेख
कोरोना संशयित रुग्णांना स्थानबद्ध करत त्यांची देखरेख करण्यासाठी ठाणे पालिकेसह कल्याण, उल्हासनगर, पालघरमध्ये स्वतंत्र इमारतींची व्यवस्था करण्यात आली आहे. संशयित रुग्णांच्या चाचण्यांचे निदान येईपर्यंत त्यांना याच इमारतींमध्ये 24 तास डॉक्टरांच्या देखभालीखाली ठेवण्यात येणार आहे. ठाण्यात श्रीनगर येथे 25 खाटांची तर गार्डनिया येथे 15 खाटांची क्षमता असलेल्या इमारती पालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय पालिकेच्या कळवा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. ज्युपिटर रुग्णालयात दोन, काळसेकर रुग्णालयात दोन, वेदांतमध्ये दोन खाटांचे केंद्र उभारण्यात आले आहे. कल्याणच्या गांधारी परिसरात पालिकेची तीन मजली इमारत कोरोना संशयितांसाठी सज्ज करण्यात आली आहे. सध्या 10 खाटांची व्यवस्था येथे करण्यात आली असून गरज पडल्यास याची क्षमता १०० खाटांपर्यंत करण्याची तयारी पालिकेने केली आहे. याशिवाय पालिकेच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात प्रत्येकी पाच खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उल्हासनगर पालिकेच्या रुग्णालयातही विशेष कक्ष स्थापन केला आहे. वसई-विरारमध्ये २०० खाटांची क्षमता असलेली इमारत पालिकेने उपलब्ध केली आहे.
शेअर बाजार कोसळला आणि सावरला!
गुरुवारी तब्बल 2919 अंकांच्या घसरणीनंतर शुक्रवारीही मुंबई शेअर बाजाराची सुरुवात पडझडीनेच झाली. त्यामुळे 45 मिनिटे ट्रेडिंग बंद करण्याची वेळ आली. त्यानंतर बाजार सावरला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये 1325 अंकांनी वाढ झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स 34103 अंकांवर स्थिरावला होता.
‘कोरोना’मुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अनेक देशांनी आपल्या देशाची सीमा बंद केल्यामुळे व्यापार ठप्प झाला आहे. याचेच पडसाद या आठवडय़ात मुंबई शेअर बाजारात पाहायला मिळाले.
शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदा सेन्सेक्स तब्बल 2919 अंकांनी कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 11 लाख कोटी बुडाले. शुक्रवारी मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टीची सुरुवातच मोठय़ा पडझडीने झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल 3400 अंकांनी कोसळला. निफ्टीत 900 अंकांची घसरण झाली. त्यामुळे शेअर बाजाराचे ट्रेडिंग 45 मिनिटांसाठी रोखण्यात आले. 1987 नंतर पहिल्यांदाच मोठी घसरण झाली.
सोशल मीडियात अफवा पसरवणाऱयांवर कारवाई
सोशल मीडियात कोरोना विषाणूबाबत अफवा पसरवणाऱयांवर कारवाई केली जाणार आहे. जनतेत घबराट पसरू नये म्हणून पोलिस खबरदारी घेत आहेत. यासाठी पोलिसांचा सायबर
विभाग पुढे सरसाकला आहे.
सर्वोच्च न्यायालयात तातडीच्या खटल्यांची सुनावणी
कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयानेही खबरदारी घेतली आहे. पक्षकारांच्या प्रवेशावर मर्यादा आणतानाच न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत केवळ महत्त्वाच्या, तातडीच्या खटल्यांवरच सुनावणी घेण्याचे ठरवले आहे.
कुलाब्यातील अलाना हाऊसमधील नमाज बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुलाबा येथील अलाना हाऊसमध्ये नमाज अदा करणे बंद केले आहे. जोपर्यंत कोरोना विषाणूचा प्रभाव पूर्णपणे कमी होत नाही, तोपर्यंत येथील नमाज बंद राहील, असे अलाना हाऊसच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पुण्यात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला
पुण्यात आज आणखी एक कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 10 कर गेली आहे. दहा रुग्णांवर नायडू रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच परदेशातून येणाऱया प्रवाशांची तपासणी करून त्यांना सोडण्यात येते. त्यानुसार पुण्यात 311 जण देखरेखीखाली आहेत, अशी माहिती पुण्याचे किभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ताडोबातील विदेशी पर्यटकांचे बुकिंग रद्द
चंद्रपूर जिह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दरवर्षी मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत मोठय़ा प्रमाणावर विदेशी पर्यटक येत असतात. मात्र कोरोना व्हायरसच्या भीतीने येणाऱया अनेक विदेशी पर्यटकांनी बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत जवळपास 70 टक्के विदेशी पर्यटकांनी आपले ताडोबा बुकिंग रद्द केले आहे.
गोव्यात साथीचा रोग कायदा लागू
कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी गोव्यात सरकारने साथीचा रोग कायदा 1897 लागू केला आहे. कोरोना रोखण्यासाठी काय उपाययोजना करायच्या यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पणजी येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यात साथीचा रोग कायदा 1897 लागू केल्याचे जाहीर केले.
घरातूनच काम करा
खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाNयांना घरातूनच काम करण्याची परवानगी द्यावी, अशा सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.
17 रुग्णांना गंभीर लक्षणे नाहीत
मुंबई, पुणे, नागपूरमध्ये विलगीकरण कक्षाची सोय केली आहे. जनतेच्या आरोग्याची राज्य सरकार पावले उचलत आहे. सुदैवाने 17 रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळलेली नाहीत. पण वेळेत सावध झालो आणि दक्षता घेतली तर पुढील धोका टाळू शकतो. म्हणूनच एपिडमीक डिसीज 1897 च्या कलम 19 दोन अंतर्गत राज्य सरकार अधिसूचना काढत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
पुणे, पिंपरीमधील शाळा बंद
शाळा व महाविद्यालयांत दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू राहतील. पण खासकरून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येतील.
हिंदुजा रुग्णालयात ऍलर्ट
- हिंदुजा रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णाने उपचार घेतल्यामुळे तेथील डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी, अतिदक्षता विभागातील रुग्ण अशा एकूण 82 लोकांवर लक्ष ठेवण्यात आले आहे.
- यापैकी 74 लोकांना त्यांच्या घरातच स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. पुढील 14 दिवस त्यांच्यावर देखरेख ठेवून त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून येतात का याची खात्री करण्यात येणार आहे.
- तर त्या रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आलेल्या आठ हाय रिस्क रुग्णांना हिंदुजा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
- त्यांच्या थुंकीच्या नमुन्याची कस्तुरबा रुग्णालयात चाचणी करण्यात येत असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही
राज्यात ज्या संस्थांना धार्मिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे ती रद्द करण्यात येणार असून पुढील आदेश होईपर्यंत कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे लग्न समारंभातही आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
हस्तांदोलन नको!
गर्दी टाळणे, हात मिळवणे, हात धुणे, हस्तांदोलनाऐकजी दुरून नमस्कार करणे असे छोटे पण परिणामकारक उपाय आहेतच. पण याशिवाय इतर बाबींची इतरांनी तत्काळ अंमलबजावणी करावी यासाठी सरकारने काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
15 फेब्रुवारीनंतर सात देशांतून आलेल्या प्रवाशांना वेगळे करणार
15 फेब्रुकारीनंतर चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, प्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशांतून प्रवास केलेल्या प्रवाशांना पूर्णपणे क्कॉरंटाइन करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. मात्र राज्यात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये अमेरिका आणि दुबई येथून प्रवास केलेले व्यक्ती असून या दोन देशांचादेखील पूर्णपणे क्कॉरंटाइन करण्याच्या यादीतील देशांमध्ये समावेश करण्याची मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली आहे.
मराठी नाटय़ संमेलनावर तूर्त पडदा
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील विविध कार्यक्रम रद्द किंवा पुढे ढकलण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली येथे पार पडणारे 100के मराठी नाटय़ संमेलन कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नाटय़ परिषदेने दिली आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 27 मार्चपासून हे नाटय़ संमेलन सुरू होणार होते. 27 मार्च ते 14 जून दरम्यान हे नाटय़ संमेलन पार पडणार होते. दरम्यान उद्यापासून नागपूर जिह्यातील हिंगणा येथे सुरू होणारे 67वे विदर्भ साहित्य संमेलनही पुढे ढकलण्यात आले आहे.
मुंबईत चौथा पॉझिटिव्ह; राज्यात 19 रुग्ण
- मुंबई 4
- ठाणे 1
- नगर 1
- नागपूर 3
- पुणे 10
प्रयोगशाळांची संख्या वाढविणार
प्रयोगशाळांमध्ये उपकरणांची आवश्यकता असून प्रयोगशाळांची संख्या वाढविण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे. किटस् वाढविण्याबाबत पंतप्रधानांना पत्रदेखील पाठविण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शासनाने आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना आणि व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेतली असून नागरिकांनी घाबरून न जाता सर्वांनी मिळून या संकटाचा मुकाबला करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मुंबईतील शाळा बंद नाहीत
मुंबईत आपण शाळा बंद केलेल्या नाहीत. कारण उगाचच भीतीचे वातावरण तयार व्हायला नको. खासगी शाळा स्वतःहून बंद केल्या आहेत. पण आवश्यकतेपेक्षा जास्त भीती लोकांमध्ये निर्माण नको याची खबरदारी आपणही घेतली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
परीक्षांचा निर्णय आरोग्य विभागाशी चर्चा करून
शाळांच्या परीक्षा लवकर घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शाळांच्या परीक्षा लवकर घेण्यापेक्षा थोड्या उशिराने घेणे योग्य राहील. कारण पुढील १५ दिवस काळजी घेण्यासारखे आहेत. आता लक्षणे दिसायला लागली आहेत. पहिला रुग्ण ६-७ मार्चला रुग्णालयात दाखल केला आहे. सुदैवाने सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. म्हणून अधिक गंभीरतेची वाट न बघता वेळीच धोका टाळण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे शिक्षण व आरोग्य विभागाशी चर्चा करून आढावा घेऊन मग परीक्षांचे काय करायचे त्याचा निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आयपीएल 15 एप्रिलपर्यंत स्थगित
कोरोना व्हायरसचा फटका क्रीडाविश्वाला बसला असून हिंदुस्थानातील आयपीएल या टी-20 लीगवरही याचे पडसाद उमटले आहेत. 29 मार्चपासून सुरू होणारी ही स्पर्धा आता पुढे ढकलण्यात आली आहे. 15 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती बीसीसीआयकडून शुक्रवारी देण्यात आली. त्यानंतर कोरोनाशी निगडित असलेले वातावरण पाहून स्पर्धा खेळवायची की आणखी पुढे न्यायची की रद्द करावयाची याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका यांच्यामधील वन डे लढतीतील उर्वरित दोन लढतीही रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला आहे. या दोन देशांमधील पहिली लढत पावसामुळे रद्द झाली होती. आता दोन देशांमधील ही मालिका आता आगामी काळात घेण्यात येणार आहे. तारखा अद्याप निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. बीसीसीआय व दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड या दोन्ही बोर्डाकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.






























































