
कर्नाटकच्या सीमाभागातील मराठी नागरिकांमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न ‘कन्नड रक्षण वेदिका’ समितीसारख्या संघटनांना पुढे करून, कर्नाटकातील सरकारकडून सुरू आहे. सीमाभागातील स्थिती स्पह्टक बनली असतानाच, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे चिथावणीखोर वक्तव्य करून कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. त्यामुळे सीमाभागातील जनता ही दहशतीखाली असून, कर्नाटकच्या बेताल मुख्यमंत्र्यांना आपले तोंड आवरायला सांगा, अशा शब्दांत महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट आहे, मात्र सीमाभागातील बेळगाव, निपाणी, कारवार या भागांतील तब्बल 865 गावे स्वातंत्र्यानंतर कर्नाटक सरकारच्या दडपशाहीखाली जीवन पंठत आहेत, याकडे या निवेदनात गृहमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. सीमाभागातील नागरिक नियम आणि कायदा पाळून राहत असताना, त्यांना दुय्यम वागणूक देत हा भाग महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी कर्नाटकाने सुरुवातीपासूनच हालचाली केल्या आहेत. कन्नड वेदिक रक्षिक समितीसारख्या उपद्रवी संघटनांना पुढे करून सीमाभागात कर्नाटक सरकार पुरस्कृत दहशतवाद सुरू आहे. कर्नाटकची विधानसभा बेळगावात उभारणे, छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्सवाला मज्जाव करणे, यांसारखी कृत्ये कर्नाटक सरकारच्या इशाऱयावर सुरू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सार्वभौम असे संविधान प्रदान केले आहे. कर्नाटक सरकारची सध्याची दंडेलशाही म्हणजे या संविधानाच्या मूळ उद्देशालाच हरताळ असून त्याची गंभीर दखल केंद्र सरकारने घ्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर शिवसेना खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, ओम निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, सुनील तटकरे आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह काँग्रेसचे खासदार सुरेश धानोरकर यांच्या स्वाक्षऱया आहेत.
राज्यपालांना घरी पाठवा
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घरपाठवणी करा, अशी मागणी आज शिवसेना खासदारांनी केली. संसदेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाजवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे व ओम निंबाळकर यांनी फलक फडकावत व घोषणाबाजी करत राज्यपालांच्या बेताल विधानांचा निषेध नोंदवला. लोकसभेत आजही कर्नाटकच्या दंडेलीविरोधात शिवसेना खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
सीमाभागातील नागरिकांच्या व्यथा मांडण्यासाठी महाविकास आघाडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट मागितली होती, मात्र गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे निमित्त पुढे करून अमित शाह यांनी ही भेट नाकारली. त्यानंतर महाविकास आघाडीने एक सविस्तर निवेदन केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठविले आहे.



























































