
विधान परिषदेची निवडणूक एकजुटीने लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. हुकूमशाहीविरोधातील ही लढाई असून हुकूमशहांच्या उमेदवारांना जोरदार टक्कर देऊन त्यांना रोखायचेच, असा निश्चय आघाडीतील सर्व घटक पक्षांनी या वेळी केला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटप, उमेदवार व अन्य मुद्दय़ांवर चर्चा झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी मंत्री हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, आमदार वजाहत मिर्झा, माजी आमदार हेमंत टकले आदी उपस्थित होते. विधान परिषदेच्या पाचही जागा महाविकास आघाडी एकत्रित व एकदिलाने लढवणार असल्याचे बैठकीनंतर सुभाष देसाई, जयंत पाटील आणि नाना पटोले यांनी सांगितले.
विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचा पराभव करण्याच्या रणनीतीवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यासोबतच आघाडीत सहभागी पक्ष कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार यावरही चर्चेनंतर निर्णय घेण्यात आला. आज मराठवाडा आणि नागपूरचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून उद्या अमरावतीचा अर्ज दाखल केला जाईल. इतर पक्षांनी जे अर्ज दाखल केले आहेत त्या सर्वांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपकडून कोकण शिक्षक ज्ञानेश्वर म्हात्रे, अमरावती पदवीधर रणजीत पाटील आणि मराठवाडा शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाशिकचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही.
पाचही जागा जिंकण्याचा निर्धार
पाचही जागा एकत्रितपणे लढवून त्या जिंकण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला असून विधान परिषदेत महाविकास आघाडीचे वर्चस्व कायम राहील, असा ठाम विश्वास शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. नागपूरच्या शिक्षक मतदारसंघातील जागा शिवसेना लढत आहे. तिथे इतर संघटनांचे उमेदवार आहेत. त्यांच्याशीही आम्ही चर्चा करत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हुकूमशाही पद्धतीच्या व्यवस्थेचे जे उमेदवार असतील त्यांना टक्कर देऊन रोखायचेच, असा निश्चय आम्ही केल्याचे देसाई म्हणाले.
– अमरावती, नाशिकची जागा कॉंग्रेस तर मराठवाडय़ातील जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस लढवत आहे. कोकणात शेतकरी कामगार पक्ष आमच्या आघाडीबरोबर असल्याने तेथील जागा त्यांच्यासाठी सोडण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार
नागपूर गंगाधर नाकाडे (शिवसेना)
अमरावती धीरज लिंगाडे (काँग्रेस)
कोकण बाळाराम पाटील (शेकाप)
मराठवाडा विक्रम काळे (राष्ट्रवादी काँग्रेस)
नाशिक डॉ. सुधीर तांबे (काँग्रेस)



























































