महाविकास आघाडीचे शनिवारी कोल्हापुरात आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज यांचा भाजपकडून सातत्याने होणारा अवमान, सीमाप्रश्नी कन्नडीगांची सुरू असलेली दंडेलशाही, याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून शनिवारी 10 डिसेंबरला कोल्हापुरात निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी हे आंदोलन होणार आहे. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्र सीमाबांधवांच्या पाठीशी ठाम असल्याचे कर्नाटकला ठणकावून सांगणार असल्याचेही महाविकास आघाडीच्या कोल्हापुरातील नेत्यांकडून यावेळी सांगण्यात आले.

राज्यपाल, भाजपचे प्रवक्ते, मंत्री, आमदारांकडून छत्रपती शिवरायांचा वारंवार अवमान करण्यात येत आहे. त्यानंतर लगेचच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडून महाराष्ट्रातील गावांवर दावा करणारी वक्तव्ये झाली. त्यातच मंगळवारी बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले झाले. याचे संतप्त पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटकला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या कोल्हापुरातील पदाधिकाऱयांची बैठक झाली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार ऋतुराज पाटील, जयश्री जाधव उपस्थित होते.

बोम्मई सरकारची ब्रिटिशांसारखी राजवट – हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ म्हणाले, ब्रिटिशांपेक्षा मोठी राजवट असल्यासारखे बोम्मई सरकार वागत आहे. सीमाभागात मराठी भाषिकांचा छळ करत आहेत. महाजन आयोग सदोष असता, तर सुप्रीम कोर्टाने सीमाबांधवांची याचिका दाखल करून घेतली नसती. त्यामुळे भांडण लावून संघर्ष करण्याचा प्रयत्न बोम्मई करत आहेत. कर्नाटकात पुन्हा भाजपचे सरकार येणार नसल्याने येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सीमाप्रश्न चिघळवत ठेवण्याचा प्रयत्न बोम्मई करत आहेत.

…तर दगड हातात घेऊ – संजय पवार
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, कोश्यारी हे नाव घेण्याच्याही लायकीचे नाही. राज्यपालांकडून छत्रपती शिवरायांचा अवमान झाला, तरीही शिवसेनेसोबत गद्दारी करून गेलेलेही गप्प बसले आहेत. ही शरमेची बाब आहे. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई रोज वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. सीमा भागात जायचेच नव्हते तर चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई या मंत्र्यांनी तशी घोषणा केलीच कशाला? यामुळे मराठी माणसाचे खच्चीकरण झाले आहे. सीमाभागात कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. याबाबत ‘तुम्ही आमची 50 वाहने फोडली, तर आम्ही तुमची 100 वाहने फोडू, तुम्ही वीट घेतली, तर आम्ही दगड घेऊ असा इशारा संजय पवार यांनी दिला.