पराभव दिसत असल्यानेच सरकार निवडणुका घेत नाही – नाना पटोले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांत झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहून सत्ताधारी पक्षाला भीती वाटत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गट व भाजपाचा धुक्वा उडाला व शेतकऱयांनी महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला. मागील तीन वर्षात झालेल्या प्रत्येक निवडणुकीत सत्ताधाऱयांचा दारुण पराभव होत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाहीत, असा सणसणीत टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.

खारघरमध्ये सरकारने हत्याकांड घडवले पण अजून एकही गुन्हा नोंद केलेला नाही आणि कसलीही कारवाई झालेली नाही. तर बारसूमध्ये जनतेवर अत्याचार करत आहेत. बारसूचा रिफायनरी प्रकल्प हा कोकणच्या विकासासाठी नाही तर सरकारच्या बगलबच्च्यांच्या विकासासाठी आहे हे उघड झालेले आहे. आज जर सरकारने निवडणुका लावल्या तर त्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.