
बोगस खोटी बिले तयार करून एक कोटी 46 लाख 39 हजार 756 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठवाडा रेल कोच फॅक्टरीसाठी नवीन 33 केव्ही लाईनच्या कामासाठी साहित्य खरेदी करण्यात आलं होतं. याची बोगल बिले तयार करून महावितरणला देण्यात आली होती. ही बिले नंतर सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती.
श्री मोरया निर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, विजयकुमार हरिभाऊ बारकुल यांनी सदर प्रकरणी तक्रार दिली आहे. या तक्रारीत मुकेश हिराचंद हेबाडे, जमीर अमीर पाशा शेख आणि सईद तकुल्ला सईद जफरुल्ला कादरी (के.एफ.ट्रेडर्स कलबुर्गी कर्नाटक) या तिघांनी संगनमत केल्याचे म्हटले आहे. या तिघांनी मराठवाडा रेल कोच फॅक्टरीच्या 33 केव्ही लाईनच्या कामासाठी लेखी करार करून न देता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आणि 2019 ते नोव्हेंबर 2022 या काळात खरेदी केलेल्या साहित्याचे बनावट बोगस खोटी बिले तयार करून घेतली असे तक्रारीत म्हटले आहे.
























































