
प्लॅस्टिक स्क्रॅप व्यवसायाच्या ठिकाणी असलेल्या विद्युत कनेक्शनचा भार वाढवून 40 एच.पी. करण्यासाठी सुधीर पठारे या ‘महावितरण’च्या ठेकेदाराने एका व्यावसायिकाला तब्बल एक लाख दोन हजार रुपयांची लाच मागितली. त्यापैकी 51 हजार रुपयांची लाच घेताना या ठेकेदाराला सोमवारी सायंकाळी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने राहुरी फॅक्टरी परिसरात ताब्यात घेतले. सुधीर भास्कर पठारे (वय 33, रा. बेलापूर रोड, देवळाली प्रवरा, ता. राहुरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
फिर्यादीचा प्लॅस्टिक क्रॅप करण्याचा व्यवसाय आहे. व्यवसायासाठी त्यांनी महावितरण कंपनीकडून विद्युत कनेक्शन घेतलेले आहे. मात्र, कामासाठी 40 अश्वशक्तीचा भार आवश्यक असल्याने त्यांनी महावितरणकडे ऑनलाइन अर्ज केला होता. महावितरणच्या अधिकाऱयांनी ठेकेदार सुधीर पठारे याला भेटण्यास सांगितले. पठारे याने महावितरणच्या अधिकाऱयांबरोबर असलेल्या ओळखीचा फायदा घेऊन तक्रारदाराकडे काम करून देण्यासाठी एक लाख 10 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख दोन हजार रुपये देण्याचे ठरले. त्यापैकी 51 हजार रुपये लगेच व उरलेली रक्कम काम झाल्यानंतर देण्याचे ठरले.
तक्रारदाराने याबाबत नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार पथकातील पोलीस निरीक्षक संदीप घुगे यांनी त्यांच्या पथकासह सोमवारी सायंकाळी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरातील बिरोबावाडी फाटा, बेलापूर फाटा येथे सापळा रचला. तेथे तक्रारदाराकडून 51 हजारांची रोकड स्वीकारताना सुधीर पठारे या ठेकेदाराला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संदीप घुगे तपास करीत आहेत.

























































