माहीम बीच कात टाकणार, 2.5 कि. मी. समुद्रकिनाऱ्याचे पालिका सुशोभीकरण करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

कोळी संस्कृती, जिम, पार्किंग, मुलांसाठी खेळणी, स्वच्छ किनारा, आकर्षक रोषणाई आणि अद्ययावत सुविधा माहीमच्या बीचवर लवकरच उपलब्ध केल्या जाणार आहेत. 2.5 किमी चौपाटीच्या सुशोभीकरणासाठी पालिका एक कोटी 26 लाख 83 हजार रुपये खर्च करणार आहे.

मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा, मनोरी आणि गोराई अशा सात चौपाट्यांवर मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांची दररोज गर्दी होते. या पार्श्वभूमीवर पर्यटनाला चालना देण्यासाठी पालिकेने आता दुर्लक्षित असलेल्या माहीम चौपाटीच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. संपूर्ण किनाऱ्याजवळील पायवाटेची पुनर्बांधणी आणि आवश्यकतेनुसार पक्की पायवाट बांधण्यात येईल. पर्यटक आणि रहिवाशांच्या सुरक्षेसाठी दर्जेदार लाइट आणि टॉयलेटची व्यवस्थाही करण्यात येईल.

किनाऱ्याच्या सुशोभीकरणात जुन्या बोटी, जाळी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. यामुळे पर्यटक-मुंबईकरांना समुद्रकिनाऱ्याकर कोळी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. याशिवाय किल्ल्याची ऐतिहासिक प्रतिकृतीही तयार करण्यात येईल.

अशा होणार सुधारणा
किनाऱ्यावर विविध प्रकारची शोभेची झाडे, फुलझाडे लावणार.
पर्यटकांना बसण्यासाठी आरामदायी आसने.
हिंदुस्थानी संस्कृतीचे दर्शन घडवणारे सण-उत्सव साजरे करण्यासाठी प्रशस्त मोकळी जागा.
या शिवाय पे-ऍण्ड पार्कच्या व्यवस्थेमुळे पालिकेला उत्पन्नाचे साधन मिळणार.
शिवाय उंचावरून मुंबईचा नजारा पाहण्यासाठी टॉवरही बनवण्यात येईल.