माजलगावात ‘एकनाथ बनला वृद्धांचा दूत’, गरिबांच्या मदतीसाठी सरसावले अनेकांचे हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना समुळ नष्ट करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या लॉकडाऊन व संचारबंदी यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कुटूंबाची उपासमार होत आहे. मात्र एकनाथ मस्के या तरुणाने स्वतःची आर्थिक परिस्थिती जास्त सबळ नसतानाही समाजाचे आपण काही देणे लागतो म्हणून आपल्या पात्रुड गावांतील वृद्धांचा आधार बनून सर्व वृद्धांना प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे तब्बल एक लाख रुपयांचे वाटप केले. मस्के यांच्या या उपक्रमाचे स्वागत होत आहे. तर इतर अनेकांनी गोरगरिबांना झोपड्यावर जाऊन किराणा साहित्यासह जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.

नित्रुड येथील शेख मेहबूब, शेख चांद यांनी गरीब व निराधार अशा 100 व्यक्तींना धान्य, पिठ, साखर, डाळ,तेल,मीठ, चहापत्ती आदी किराणा वस्तुंचे मोफत वाटप केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी माजलगाव शहराच्या परिसरात पालावर राहणाऱ्या फिरस्ती अशा 30 कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे आवश्यक किराणा सामान वाटप केले. तसेच शहरात बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना एक वेळची न्याहरी देण्याचा उपक्रम हातात घेतला आहे. या उपक्रमात पंडित मेंढके, अभय कोकड, गुड्डू उनवणे, माऊली आहेर, विक्रम सिरसट,अभिजित कोंबडे यांनी पुढाकार घेतला. बिलाल मोहल्ला कमेटीतर्फे पोलिसांना नाश्ता व पाणी याची व्यवस्था केली तसेच उपनिरीक्षक भटकर यांच्याहस्ते गरीब जनतेस अन्न धान्य वाटप करण्यात आले.तर पालावरच्या कुटुंबाना आधार मल्टीस्टेटच्या वतीने जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.येथील महेश ठोंबरे यांनी तब्बल दहा हजार मास्कचे मोफत वाटप केले.