यंदाची मकर संक्रांती आहे खास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मकर संक्रांत म्हटले की डोळय़ासमोर येतात तीळगुळाचे लाडू आणि आकाशात उंच भरारी घेणारे रंगीबेरंगी पतंग. तीळगूळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. विविधरंगी पतंग, हलव्याचे दागिने, तिळाचे लाडू आणि पूजेसाठी लागणारे साहित्य इत्यादी वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत. विशेष म्हणजे, दरवर्षी 14 जानेवारीला येणारी मकर संक्रांत यंदा 15 जानेवारीला आल्याने खास ठरली आहे.

शनिवार, 14 जानेवारी रोजी रात्री 8.44 वाजता सूर्याने निरयन मकर राशीत प्रवेश केल्याने यंदा मकर संक्रांती 15 जानेवारी रोजी आल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण सांगतात. मकर संक्रांतीला वस्त्रदान, अन्नदान, तीळगूळ दान देण्याची प्रथा आहे, परंतु आधुनिक काळात विद्यादान, श्रमदान, ग्रंथदान, रक्तदान करणे हेही तितकेच पुण्यदायक आहे असे त्यांनी स्पष्ट केले. सन 1899 मध्ये 13 जानेवारीला आली होती. 1972 पर्यंत मकर संक्रांती 14 जानेवारीलाच येत होती. 2085 पर्यंत मकर संक्रांती कधी 14 ला तर कधी 15 जानेवारीला येत राहील, असे त्यांनी सांगितले.

सन 2100 पासून 16 जानेवारीला येणार
सन 2100 पासून निरयन मकर संक्रांती 16 जानेवारीला येणार आहे. सन 3246 मध्ये निरयन मकर संक्रांती चक्क 1 फेब्रुवारीला येणार आहे. त्यामुळे निरयन मकर संक्रांती नेहमी 14 जानेवारीलाच येते हे खरे नाही. सन 2024, 2027 मध्ये निरयन मकर संक्रांती 15 जानेवारीला तर सन 2025, 2026, 2029, 2030 मध्ये 14 जानेवारीला येणार आहे.

मकर संक्रांती अशुभ नाही!
कोणतीही वाईट घटना घडली की, ‘संक्रांत आली’ असे म्हटले जाते हे योग्य नाही, असे सांगून श्री. दा. कृ. सोमण म्हणाले, धनू राशीतून मकर राशीत सूर्याने प्रवेश करणे वाईट कसे असू शकेल? या दिवसापासून दिनमान वाढत जाणे हे वाईट कसे म्हणता येईल? तीळगूळ देऊन गोड बोलायला शिकविणारा हा दिवस वाईट कसा असू शकेल? संक्रांती देवीने जर या दिवशी दुष्ट राक्षसाला ठार मारले असेल तर ते वाईट कसे असू शकेल? मकर संक्रांतीचा सण हा अशुभ नाही. वाईट नाही. मकर संक्रांतीच्या वेळी अनेक खोटय़ा व चुकीच्या अफवा पसरविल्या जातात त्यावरही विश्वास ठेवू नका.