‘आपुलाचि वाद आपणासी’

277

>> मलिका अमरशेख

माणूस तसा अगम्य. सहजासहजी तो लक्षात येत नाही. अनेक इच्छा-अपेक्षांचं ओझं मानगुटीवर ठेऊन त्याचा प्रवास सुरू असतो. या इच्छा-अपेक्षांच्या भोवतीच त्याचं सारं जग फिरत असतं. या वाटेवर अनेक कृष्णविवरं असतात. या विवरांना टाळत होणारा प्रवास एक वेगळी अध्यात्मिक उंची गाठतो. या अध्यात्माची, तत्त्वज्ञानाची सांगड घालत घडतो तो समाज निरोगी योगी समाज असं नक्कीच म्हणता येईल.

हिंदुस्थानी तत्त्वज्ञानात, आयुष्यात आणि समाजात अध्यात्म-योग यांचं महत्त्व निर्विवादपणे बरंच आहे आणि पूर्वापार काळापासून, ऋषीमुनींपासून अगदी महाभारत काळापासून अध्यात्म-योग यांचे संस्कार खोलवर रुजलेले… फक्त फरक एवढाच, पूर्वी या साधनेला फार मोठी तपस्या, साधना व अभ्यास लागायचा, आता मात्र तसं नाही. कुणीही योग करू शकतो.

‘धर्म ही एक अफूची गोळी आहे’, असं पूर्वसुरीचं म्हणणं, मात्र ही अफू उतरवायला तत्त्वज्ञान हा एक उत्तम उपाय आहे तो कुणीच आचरताना दिसत नाही. हिंदुस्थानी तत्त्वज्ञान म्हणजे फक्त ‘भगवद्गीता’ असंच सर्वसाधारणपणे लोकांना वाटतं, पण याउलट फक्त हिंदुस्थान हाच असा एकमेव देश असावा की, ज्यात मृत्यूनंतरच्या जीवनाचंही एक दर्शनशास्त्र्ा होतं आणि ‘ऋणं कृष्टा, घृतं पिबन्ति’ असा फॅण्टॅस्टिक उपदेश करणारी ऋचा लिहिणारा दार्शनिक चार्वाक हा पण एकच या देशातच होऊ शकतो. चार वेदांमधल्या ‘अथर्व वेद’ यात मृत्यू व मृत्यूनंतरच्या जीवनावरचं भाष्य आहे. विविध भूतं पिशाच्य तंत्र मंत्र यावरच्या ऋचा आहेत. त्यावरचा तोडगाही आहे.

एकंदर काय, जन्मापासून मृत्यूनंतरच्या सर्व जीवनाच्या विविध व्यापक घडामोडींवर भाष्य आणि त्यावरचं तत्त्वज्ञान आहे. पण दुर्दैवानेच म्हणावं लागेल की, इतकी प्रगल्भ विविध आयामी दर्शनं असताना जीवन आणि तत्त्वज्ञान याची सांगड काही हिंदुस्थानी समाजकारणाला घालता आली नाही.
जसं की संत वाङ्मय आजही सर्वमान्य- सर्वश्रेष्ठ मानलं जातं, पण आजही त्यातल्या तत्त्वज्ञानापेक्षा त्यातला देवधर्म यालाच लोकांनी जास्त आपलं मानलं. हे त्या संतांचं दुर्दैव समजावं की देवाचं सुदैव? माणसं अनवाणी चालून लोळून नाचत, गात पंढरीच्या विठ्ठलाला भेटायला जातात; पण कमरेएवढाल्या संकटात उभे असलेल्या स्वतःला कधी भेटायला जात नाही!
‘आपुलचि वाद आपणासी’ असे संत सांगून गेलेत. संत तुकारामांनी तर ‘तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी’ असं म्हटलंय. यातून दोन जे अर्थ निघतात ते भिन्नच आहेत.malikha2

सर्जनाच्या केंद्रस्थानी आम्ही असावं – आणि त्याआधीच्या ओवीच्या रचनेप्रमाणे पाहिलं तर ‘न लगे मुक्ती आणि संपदा’ म्हणजे मुक्तीचीही अपेक्षा नाही न् ना संपत्तीची अशी ताह्या बाळाइतकी निरागस विमुग्ध कोरी विधात्मक वृत्ती आम्हास दे. आता हे म्हंजे फार भन्नाटच झालं. म्हणजे तान्हं गर्भातलं बाळच सर्वश्रेष्ठ गोष्ट जगातली. कारण त्याला जन्म-मृत्यू मुक्ती- मोह-माया कसलीच अपेक्षा नसते. म्हणजे आपण खरे बिघडतो ते जन्मल्यानंतरच! आणि इतकं सांगितल्यावरही लोक संपत्ती कमावतात त्यातला काही वाटा देवालाही लाच म्हणून देतात हे आणखीच भयंकर गंमत गोष्ट!

योगाचं खूळ हल्ली ज्याला त्याला लागलंय अगदी संसर्गजन्य रोग भरभरा पसरावा तसं. खरं तर योग म्हणजे नुसता व्यायाम किंवा प्राणायाम – कपालभाती असं नसून ती एका चिंतनाची अवस्था आहे. यात तुम्ही स्वतःचं मन आणि शरीर एकरूप करत असता. तुम्हीच विठ्ठल आणि तुम्हीच भक्त, तुम्हीच आरसा तुम्हीच बिंब, तुम्ही प्रेम करता म्हणजे काय करता? तुमच्यासारख्याच दिसणाऱया एका व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता म्हणजे स्वतःवरच प्रेम करत असता. लक्षात घ्या. माणसं नेहमी स्वतःतलं काहीएक साधर्म्य – समानधर्मी समोरच्या माणसात दिसलं की ते आकृष्ट होतात, म्हणजे ते एकप्रकारे सवतःवरच तर प्रेम असतं. कोटय़वधी वर्षे एकत्र राहणारी जोडपी जरा निरखून पाहा, ते आश्चर्यकारकपणे एकमेकांसारखे कुठे कुठे दिसतात ते यामुळेच. कारण त्यांचे व्यक्तिमत्त्वच कुठेतरी साधर्म्य सांगत असतात न् अनेक वर्षांच्या सोबतीनंतर ते एकमेकांना एवढं आकळतात की हळूहळू स्वभाव – हालचाली – आवडीनिवडी – लकबी – चेहऱयाची ठेवण पण बदलू लागते!

आपल्या जगण्याचं निश्चित उद्दिष्ट काय? मोटिव्ह काय? या प्रश्नाला उत्तर द्याल तर बरेचसे प्रश्न सुटल्यात जमा असतात. कारण या इच्छेभोवतीचं आपण न् आपलं सारं जग फिरत असतं. वाटेत अनेक कृष्णविवरं असतात तिकडं गेलात की संपलातच. मग भलत्याच गोष्टी मोठय़ा होत जातात आणि आपल्याला गिळंकृत करतात. त्या टाळून संथ सावकारी आपल्या गंतव्य ठिकाणी पोचायचंच असा पण केला की तुम्ही अंगीकारलेलं तत्त्वज्ञान तुम्हाला नेमकं तिथं पोहचवतं. कारण कुठून कुठे, कसं न् का जायचं ही गोष्ट काही आपोआप जादूसारखी होत नसते. ती तुम्ही अंगीकारलेल्या तत्त्वज्ञानात असते. मूल्यात असते – तुम्ही जे निर्णय घेता ते सारे नुसतं तुमची मर्जी म्हणून येत नाहीत वा घेतले जात नाही तर ते निर्णय घेणं ही एक जबाबदारीची गोष्ट आहे याचं भान तुम्हाला तुम्ही अंगीकारलेलं तत्त्वज्ञान ज्याला आपण स्वधर्म म्हणूयात हवं तर ते देतं. आता काहींचं जगण्याचं तत्त्वज्ञान काहीच नसणं – विचारच नसणं हेसुद्धा एक तत्त्वज्ञानच. मग त्याचे परिणामही दिसतातच. तत्त्वज्ञान नसलेला – विचार नसलेला – अध्यात्म किंवा योग (स्वचिंतन) असा समाज अशी व्यक्ती ही अधोगतीलाच जाते.
अध्यात्म आणि चिंतन ही काही ब्रह्मचारी, संन्यासी विरागी माणसांनीच फक्त करायची गोष्ट नाहीय. न् योग ही वजन कमी करण्यासाठी शंभर वर्षे जगण्यासाठी करण्याची गोष्ट नाहीय.
जेव्हा या साऱ्यांची योग्य सांगड आपण समाजजीवनाशी स्वतःच्या जीवनपद्धतीशी सकारात्मक पद्धतीनं घालू तेव्हाच एक निरोगी योगी समाज जगण्यासाठी सिद्ध झाला असं म्हणू शकू.
malikaamarshaikh1234
@gmail.com

आपली प्रतिक्रिया द्या