
संसदेच्या उंबरठय़ावर रंगलेल्या मिमिक्री नाटकावर अद्याप पडदा पडला नसून आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यातील लेटर वॉरमध्ये खरगे यांनी याच संदर्भात नव्याने लेटर बॉम्ब डागला आहे. संसदीय प्रथा-परंपरांचा घात करण्यासाठीच खासदारांच्या सामूहिक निलंबनाचा सत्ताधारी पक्षाने हत्यार म्हणून पद्धतशीर अवलंब केला असल्याचा आरोप खरगे यांनी धनखड यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.
खासदारांच्या सामूहिक निलंबनानंतर संसद अधिवेशनाचा जवळपास खेळखंडोबा झाला आहे. याच अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष परस्परांकडे बोट दाखवत असताना धनखड यांनीही या निलंबनाची सफाई देताना सभागृहातील गदारोळ हा विरोधकांनी रचलेल्या कटानुसार हेतुपुरस्सर घडवल्याचा आरोप केला होता.
19 डिसेंबर रोजी संसदेच्या कामकाजाच्या 12व्या दिवशी, टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी सभागृहाच्या गेटवर निषेधपर निदर्शने सुरू असताना धनखड यांची नक्कल केली होती. त्यानंतर या सर्व वादंगाला तोंड फुटले आहे. आता हे सर्व मागे सोडून आपल्याला पुढे जायला हवे, असे सांगत धनखड यांनी विरोधी पक्षनेत्यांना सोमवारी वा तुमच्या सोयीच्या कुठल्याही वेळी चर्चेसाठी अधिकृत निवासस्थानी यायचे आमंत्रण रविवारी पाठवलेल्या पत्रात दिले होते. याच पत्राला खरगे यांनी प्रत्युत्तर देताना, पुढे जाण्याबद्दल सहमती दर्शवली आहे. मात्र सरकारला खरोखरच सभागृहाचे कामकाज चालवायचे असेल तर सभापतींच्या दालनातील चर्चेने काही साध्य होईल असे वाटत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. दिल्लीत आल्यावर धनखड यांना भेटणे हा माझ्यासाठी बहुमान आणि कर्तव्यदेखील असेल, असे ते म्हणाले.
जनतेच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे आवाहन
संसदेच्या प्रती असलेल्या सरकारच्या हुकूमशाही आणि गर्विष्ठ वृत्तीचेच समर्थन दुर्दैवाने धनखड यांचे हे पत्र करते आहे, असे खरगे यांनी म्हटले आहे. सभागृहाचे पीठासीन अधिकारी म्हणून वास्तविक तुम्ही संसदेत सरकारला उत्तरदायी ठरवण्याच्या जनतेच्या हक्कांचे संरक्षण करायला हवे, असेही त्यांनी धनखड यांना सुनावले. संसदेचे अवमूलन करण्यासाठीच सत्ताधारी पक्षाने हेतुपूर्वक हे चालवले आहे. खासदारांचे निलंबन करून सरकारने 146 खासदारांच्या मतदारांचाच आवाज बंद केला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
डोकं वापरलेलंच नाही…
कुठलाही सारासार विचार न करता, डोक्याचा उपयोग न करता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप करत खरगे यांनी शनिवारी पाठवलेल्या दुसऱया पत्रात धनखड यांचे आरोप खोडून काढले. सभागृहात नसलेल्या एका खासदाराचे निलंबन हे डोके न वापरल्याचेच उदाहरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोकशाहीची पायमल्ली, संसदीय प्रथा परंपरांचा घात आणि घटनेची मुस्कटदाबी करण्यासाठी सोयीचे हत्यार म्हणून सत्ताधारी पक्षाने खासदारांचे निलंबन सुरू केले आहे, असा आरोप खरगे यांनी केला आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी विशेषाधिकार प्रस्तावांचाही हत्यार म्हणून उपयोग सुरू आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
आणखी किती झुकाल…
कोलकाता – आणखी किती झुकाल धनखडजी… नरेंद्र मोदी आणि भाजप यांची आणखी किती खुशामत करण्याची तुमची इच्छा आहे, असा तिखट सवाल तृणमूल काँग्रेसचे निलंबित खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केला. पेंद्रातील सत्ताधाऱयांना खुश करण्यासाठी धनखड विरोधी पक्षांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोपही त्यांनी सेरामपोर या त्यांच्या मतदारसंघातील एका सभेत केला. स्वार्थापेक्षा देशहिताकडे बघा, असा सल्लाही त्यांनी धनखड यांना दिला.
मिमिक्रीचा वाद नेमका काय?
संसदेत झालेल्या गोंधळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृह मंत्री अमित शहा यांनी लोकसभेत निवेदन करावे, अशी मागणी 13 डिसेंबर रोजी विरोधकांनी केली होती. यासाठी 14 ते 21 डिसेंबर या कालावधीत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे लोकसभेतील 100 आणि राज्यसभेतील 46 अशा एकूण 146 खासदारांना निलंबित करण्यात आले. याच काळात 19 डिसेंबर रोजी संसदेच्या मकर गेटवर आंदोलन सुरू असताना टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी धनखड यांची नक्कल केली तेव्हा अनेक खासदार हसत होते आणि राहुल गांधी व्हिडीओ बनवत होते.

























































