प्रेयसीच्या मदतीने पतीकडून पत्नीला मारण्याचा प्रयत्न, आश्वी पोलिसांत गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथील एका 24 वर्षीय विवाहित महिलेला पतीने प्रेयसीच्या मदतीने विषारी औषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सदर विवाहितेचा पती, सासू व पतीची प्रेयसी अशा तिघांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दीपक संजय जोशी, कल्पना संजय जोशी (दोघे रा. दाढ खुर्द, ता. संगमनेर) व आशा डोखे (रा. मांडवे साकूर, ता. संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शिवानी दीपक जोशी यांनी फिर्याद दिली आहे.

शिवानी यांचे पती दीपक व एका महिलेचे प्रेमसंबंध असून ते लोणी येथे खोली घेऊन राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. 8 जुलै रोजी त्या दुपारच्या सुमारास त्याठिकाणी त्या दोघांनाही एकत्र पकडल्यामुळे त्यांच्यात मोठा वाद झाला. त्यामुळे पती, सासू व ती महिला हे संध्याकाळी दाढ खुर्द याठिकाणी आले. ‘तू मला लागत नाही, तू निघून जा, मला या महिलेशी लग्न करायचे असून आमच्यात अडसर करू नको’ असे पती म्हणाला.

शिवानी जोशी यांनी या गोष्टीला विरोध केला असता पती व त्याच्या प्रेयसीने त्यांना खाली पाडले. सासूने त्यांना दाबून धरले व पतीच्या प्रेयसीने शिवानी यांचे दोन्ही हात धरले होते. यावेळी पतीने गोठय़ातून गोचिडाचे औषध आणून ‘आज शिवानीचा विषय संपवून टाकायचा’ असे म्हणत तिला औषध पाजले. याबाबत शिवानी जोशी हिने दिलेल्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पतीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.