
टॅक्सी सेवा बुक करण्याच्या नावाखाली वृद्धाची तीन लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूकप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
सांताक्रुझ येथे राहणारे एक जण हे खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर काम करतात. सप्टेंबर महिन्यात त्यांना सिक्कीम येथे कुटुंबीयांसोबत फिरायला जायचे होते. त्यासाठी त्यांनी ऑनलाइनवर सिक्कीम येथील टॅक्सी सेवेची माहिती काढली. तेव्हा त्यांना तेथे एक नंबर दिसला. त्या नंबरवर त्यांनी फोन केला. एकाने तो फोन उचलला. त्याने विमानतळ ते गंगटोक येथील टॅक्सी भाडय़ाचे कोटेशन त्यांना पाठवले.
टॅक्सी सेवा बुक करण्यासाठी सुरुवातीला 100 रुपये भरावे लागतील असे सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी पैसे ट्रान्सफर केले. मात्र ते पैसे जमा न झाल्याने ठगाने त्यांना एक लिंक पाठवून रक्कम जमा करण्यास सांगितली. त्या लिंकवरून पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला असता तेव्हाही पैसे ट्रान्सफर झाले नव्हते. काही वेळाने त्यांच्या मोबाईलवर बँकेचे दोन मेसेज आले. त्यांच्या खात्यातून 3 लाख रुपये काढल्याचे त्या मेसेजमध्ये नमूद होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे.




























































