
सामना ऑनलाईन, मंदसौर
आम्हाला भरपाई नको. माझ्या कोवळ्या मुलीवर हैवानी अत्याचार करणाऱ्या नराधमांना आधी फासावर लटकवा बस्स, अशी मागणी मंदसौर येथे रानटी अत्याचार करण्यात आलेल्या ७ वर्षांच्या बालिकेच्या वडिलांनी आज केली.
पीडित बालिकेच्या वडिलांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपये मदत जमा केली आहे अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अर्चना चिटणीस यांनी दिली. मात्र त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी आम्हाला कोणतीही मदत वा भरपाई नको, असे स्पष्ट शब्दात सांगितले.
मंदसौरच्या या बलात्कार प्रकरणाचा तपास करण्यासाठी शनिवारी राज्य सरकारने एका विशेष तपास पथकाची स्थापना केली. पोलिसांनी इरफान आणि आसिफ या दोन आरोपींना याआधी अटक केली आहे.
नराधमांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५ लाख देईन – भाजप नेता
मंदसौर बलत्कारातील नराधमांचा शिरच्छेद करणाऱ्या व्यक्तीस ५ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्याचे संजीव मिश्रा या मध्य प्रदेशच्या भाजप नेत्याने जाहीर केले आहे.
























































