श्रीमणिरामबाबा बग्गी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

अमरावती जिल्ह्यातील ‘बग्गी’ येथील थोर सत्पुरुष श्रीमणिरामबाबा यांच्या अवतारकार्याचा परिचय करून देणारा हा लेख.

अमरावती जिल्ह्याच्या चांदूर (रेल्वे) तालुक्यातील चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेल्या ‘बग्गी’ या छोटय़ाशा खेडेगावामध्ये रामजी येलकर नावाचे सद्गृहस्थ वास्तव्य करून होते. सुतारकाम करून प्रपंचाचा उदरनिर्वाह चालविणाऱया रामजी येलकरांच्या घरासमोर एके दिवशी बंडी-धोतर परिधान केलेली चाळीसेक वर्षांची व्यक्ती उभी राहिली अन् खणखणीत आवाजात ‘आम्हाला तुमच्या घरी राहावयास जागा द्याल का हो?’ असे विचारती झाली. त्या आगंतुक व्यक्तीकडे पाहून रामजींना काहीएक अर्थबोध झाला नाही.

‘बग्गी’ गावामध्ये पूर्वी कधी पाहिली नाही, पूर्वायुष्यात कधी परिचय घडला नाही अशी अनोळखी परंतु पाहताक्षणीच मनाचा ठाव घेणारी ती अपरिचित व्यक्ती एकाएकी घरासमोर उभी राहते आणि आपल्याकडे ‘आसरा’ देण्याची विनंती करते ही घटना रामजींकरिता विचित्र होती, मात्र त्यांनी अभावितपणे ‘या. हे आपलेच घर आहे’ असे म्हणून त्या अपरिचित व्यक्तीला घरात घेणे आणि तिच्या राहण्याची सोय करणे हे इतरांसाठीही तितकेच अनाकलनीय होते.

रामजी येलकर भ्रमिष्ट झाले आहेत असा विचार करून गावातील प्रत्येकानेच त्यांना अपरिचितास आश्रय दिल्याबद्दल फैलावर घेतले. मात्र, रामजींवर त्याचा काहीएक परिणाम झाला नाही. त्यांनी त्या अनोळखी व्यक्तीस घराच्या एका कोपऱयात राहण्याकरिता जागा दिली. शिवाय त्याच्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था केली. त्या व्यक्तीने मात्र रामजीस नम्रपणे नकार देत म्हटले, ‘मला तुझ्या हिश्शाचे अन्न नको. गावात भिक्षा मागून मी माझा उदरनिर्वाह चालवेन. आयते अन्न खाणे योग्य नाही. श्रम केले पाहिजेत. माणसाचा जन्म कर्म करण्यासाठी झाला आहे. निरपेक्ष बुद्धीने सतत काम करीत राहणे आणि राहिलेल्या वेळात सेवाधर्माचे पालन व ईश्वराचे चिंतन करणे हेच योग्य आहे.’ असे म्हणून त्या व्यक्तीने गावात फिरून मिळालेल्या भिक्षेवर गुजराण करण्यास आणि मोकळय़ा वेळेत ईश्वरचिंतन करण्यास प्रारंभ केला. ही व्यक्ती कुणाशी बोलत नसे, मिसळत नसे. पाहावे तेव्हा आत्ममग्न होऊन स्वतःशीच बोलत राही. नित्य सहवासात राहिल्याने त्याचे नाव मणिराम असल्याचे समजले तेव्हापासून रामजी आणि ‘बग्गी’चे ग्रामस्थ त्या व्यक्तीला मणी, मणिराम किंवा मणिरामबाबा म्हणू लागले.

एकदा गावात भिक्षाफेरीस निघालेल्या मणिरामबाबांना गोकुळदासशेठ यांनी हटकले आणि ‘काय रे, रिकामटेकडा फिरतोस! काम का करीत नाहीस?’ असे विचारले. तेव्हा बाबा म्हणाले, ‘आम्हाला कुणी काम देत नाहीत. तू दिलेस तर नक्की करेन.’ गोकुळदासशेठने लागलीच मणिरामबाबांना गुरे राखण्याचे काम दिले. तेव्हा, ‘मी पूजा करीत असताना त्यात व्यत्यय आणू नये’ ही अट घालून बाबा नित्य कामावर रुजू झाले. शेठजींच्या गुरांना जंगलात नेल्यावर बाबा तिथल्याच एखाद्या झाडाखाली बसून ध्यान करीत बसत. त्यांच्यासमोर एक पोथी ठेवलेली असे. ही पोथी म्हणजे विस्कळीत झालेला कागदांचा गठ्ठा होता. एकदा मणिरामबाबा योग्य रीतीने काम करतात की नाही हे पाहण्याकरिता शेठजी जंगलात गेले तेव्हा बाबा ध्यान लावून बसले होते आणि गुरे मोकाट चरत होती. शेठजींनी अनेकदा हाक मारली परंतु बाबांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. तेव्हा संतप्त झालेल्या शेठजींनी बाबांच्या समोरची पोथी उचलून नदीत फेकली. मात्र, आश्चर्य असे की, पोथी बुडाली नाही आणि ओलीदेखील झाली नाही. हा विचित्र प्रकार पाहून शेठजी भयचकित झाले आणि घरी निघून आले.
पुढे एकदा गोकुळदासशेठ यांनी त्यांच्या आर्वी येथे राहणाऱया नातेवाईकांस देण्यासाठीचे पत्र मणिरामबाबांकडे दिले. हे पत्र आर्वी येथे तातडीने पोहोचवण्याचे होते. शेठजी म्हणाले, ‘मण्या, हे पत्र तातडीने आर्वी येथे ने आणि येताना पत्राचे उत्तरही सोबत घेऊन ये.’ त्यानंतर बऱयाच वेळाने शेठजी खातरजमा करण्यासाठी गेले तेव्हा मणिरामबाबा ध्यान लावून बसले होते. शेठजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ते रागाने अद्वातद्वा बोलू लागले तेव्हा मणिरामबाबांनी शांतपणे गादीखाली ठेवलेले, आर्वीहून उत्तरादाखल आलेले पत्र काढले आणि शेठजींच्या हातात ठेवले. शेठजींनी पत्र उघडून पाहिले तो खरोखरीच आर्वी येथील त्यांच्या नातलगांच्या हस्ताक्षरातील ते पत्रोत्तर होते. मणिरामबाबा इतक्या जलदगतीने आर्वी येथे गेले कधी आणि तेथून आले कधी याविषयी सर्वजण आश्चर्य व्यक्त करू लागले. कालांतराने बग्गी येथील अनेक सश्रद्ध मंडळींना मणिरामबाबांमधील देवत्वाची प्रचीती येती झाली. एकदा एका दुष्टाने बाबांना पाण्यात ढकलून दिले मात्र त्यानंतर बाबांचा काही ठावठिकाणा लागेना. अशात बराच वेळ गेला तेव्हा बाबांना विहिरीत ढकलणारा स्वतःच चिंतातुर झाला आणि त्याने बाबांची मनोमन माफी मागितली. त्याला पश्चात्ताप झाल्यानंतर मगच मणिरामबाबा विहिरीबाहेर आले.

पुढे बऱयाच काळानंतर मणिरामबाबांची माहिती हाती येऊ लागली. ते कनौजचे राहणारे, काशी येथील ब्राह्मणकुळात जन्मल्याचे तसेच ‘सातेफळ’च्या श्रीमनूमहाराजांचे आप्त असल्याचे समजले. एव्हाना, मणिरामबाबांमधील ‘सिद्ध’तत्त्वाचा परिचय पंचक्रोशीत पसरला होता. त्यांच्या हातून अनेकांना उत्तम आरोग्य, धन आणि प्रापंचिक सुख लाभले त्यामुळे अवघे बग्गी गाव मणिरामबाबांचे कौतुक करते झाले. मात्र या उपाधीला कंटाळून एकेदिवशी मणिरामबाबा वर्धा जिह्याच्या पुलगाव तालुक्यातील नाचणगाव येथे निघून गेले. तेथे बजरंगगीर या सत्पुरुषासोबत त्यांचे काही काळ वास्तव्य झाले. मात्र बजरंगगीर यांच्या देहविसर्जनानंतर मणिरामबाबा पुन्हा माघारी, बग्गी येथे परतले ते रामजी येलकरांच्या घरीच आणि तिथेच ते अखेरपर्यंत राहिले.
दरम्यान, एके दिवशी बग्गी येथे शेगांवचे थोर सत्पुरुष श्रीगजानन महाराज यांचे आगमन झाले, तेव्हा त्यांनी मणिरामबाबांची भेट घेतली. मौनसंकेतातून साधलेल्या या भेटीत या दोन सत्पुरुषांनी एकमेकांशी संवाद साधला. तेव्हा मणिरामबाबांना श्रीगजानन महाराजांमध्ये श्रीगणरायाचे दर्शन झाले. या भेटीचे फलित म्हणून श्रीगजानन महाराजांनी सुचविल्यानुसार मणिरामबाबांनी पुढे दरवर्षी भाद्रपद चतुर्थीस मठामध्ये श्रीगणेशाची स्थापना करण्यास प्रारंभ केला. आजदेखील बग्गी येथे श्रीगणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात येतो.

एके दिवशी मणिरामबाबांनी रामजींना बोलावून आपल्यातील दिव्यशक्ती त्यांच्यामध्ये परावर्तित केली व अवतारसमाप्तीचे सूतोवाच केले. सांगितल्या वेळी आणि त्याच तिथीला अर्थात कार्तिक वद्य अष्टमी सन 1915 मध्ये मणिरामबाबा यांनी आपले अवतारकार्य संपवले. बग्गी या लहानशा खेडेगावाला आपल्या दैवी अधिष्ठानामुळे महत्त्व आणि ओळख प्राप्त करून देणारे सत्पुरुष ही मणिरामबाबांची ओळख आहे.

[email protected]