नवीन डेडलाईन मान्य नाही, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या! मनोज जरांगे ठाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणासंदर्भातील फेब्रुवारीची नवीन डेडलाईन आपल्याला मान्य नसून 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावलं आहे. जो काही कायदा करायचा असेल तो 24 डिसेंबरपूर्वी करावा, त्यानंतर नव्याने आंदोलनाला सुरुवात होईल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी यावेळी दिला.

भानावर या आणि हे आंदोलन गांभीर्याने घ्या. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाचा घाट कशाला घालताय? आहे त्या अधिवेशनात चार दिवस वाढवून घ्या आणि आरक्षण द्या, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी यावेळी केली.

सरकारच्या वेळकाढूपणावरही त्यांनी टीका केली. ‘हे सरकार विशेष अधिवेशनाच्या नावाखाली वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न करत आहे. हा घाट घालून वेळकाढूपणा करू नका, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आम्ही त्यामध्ये बसतोय. बाकी कशातून आरक्षण दिलं तर ते टिकणार नाही. त्यामुळे बाकी आरक्षण देऊन सरकारने मराठ्यांची फसवणूक करू नये, असंही जरांगे यावेळी म्हणाले आहेत.