
देशभरात कोरोनाचे संकट थैमान घालत असतानाच जम्मूतील अनेक नेत्यांना हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने शनिवारी धमकी दिली आहे. भाजप, काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्ससह सर्व पक्षाच्या नेत्यांचा त्यात समावेश आहे. हिजबुल मुजाहिद्दीनने चिठ्ठी पाठवत या नेत्यांना राजकारणापासून दूर राहण्यास सांगितले आहे. राजकारणात राहिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा हिजबुलने या नेत्यांना दिला आहे. हिजबुलकडून आलेल्या या चिठ्ठ्यांबाबत पोलीस तपास करत आहेत. दहशतवाद्यांनी त्यांचा मोर्चा आता नेत्यांकडे वळवला असून दहशतवाद्यांकडून नेत्यांना धमकी देण्यात आली आहे.
काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष रमण भल्ला यांच्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर शनिवारी दुपारी हिजबुलच्या धमकीची चिठ्ठी लावल्याचे आढळले. त्यांनी मिट्ठा पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे. पोलीसांनी याबाबत तपासाला सुरुवात केली आहे. हिजबुल मुजाहिद्दीनच्या लेटरपॅडवर ही चिठ्ठी लिहिण्यात आली आहे. आमची मोहीम पंचायत नेत्यांच्या हत्येपासून सुरू झाली आहे. आमच्या मोहिमेत तुमचे राजकारण अडचण ठरत आहे. त्यामुळे तुम्ही राजकारणापासून दूर राहा. तुम्ही राजकारण सोडल्यास आम्ही तुम्हाला माफ करू,असेही चिठ्ठीत म्हटले आहे. आम्ही सूचना दिल्याशिवाय कोणालाही हानी पोहचवत नाही. त्यामुळे राजकारणापासून दूर राहण्याचा इशारा देत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे. राजकारण सुरुच ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही चिठ्ठीत म्हटले आहे.
जम्मूतील अनेक नेत्यांना हिजबुल आणि दहशतवाद्यांकडून धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे नेत्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्याची मागणी भल्ला यांनी केली आहे. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, खासदार जुगल किशोर शर्मा, माजी उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह, नॅशनल कॉन्फरन्सचे विभागीय अध्यक्ष देवेंद्र सिंह राणा, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र रैना, माजी मंत्री चौधरी लाल सिंह,सुनाल शर्मा, शक्ती परिहार आणि पँथर्स नेते हर्ष देव यांनाही या चिठ्ठीतून धमकी देण्यात आली आहे.
























































