राज्यपालांविरुद्ध क्रांतीचौकात निदर्शने करणार्‍या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संपूर्ण जगाचे आदर्श असलेले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून छत्रपतींचा अवमान करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने संभाजीनगर शहरातील क्रांतीचौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराज जुने पुराने असून, तरुणांनी आता नवीन आदर्श शोधले पाहिजेत, असे संतापजनक विधान केले. कोश्यारी यांच्या या वायफट विधानावरून राज्यभरात संतापाची लाट उसळली असून सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत कोश्यारी वारंवार वादग्रस्त विधान करत असून त्यांची हकालपट्टी करा अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.