
मराठा आरक्षणाचा वणवा पेटला असून मराठवाड्यातील जवळपास तीन हजार गावांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. यापैकी बहुतांश गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. आंदोलकांनी बसवर लावण्यात आलेल्या ‘गतिमान’ सरकारच्या जाहिरातीतील पंतप्रधानांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या छायाचित्रांना काळे फासले.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाचा वन्ही चेतला. 40 दिवसांची मुदत देऊनही राज्य सरकारने विश्वासघात केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. जरांगे यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मराठवाड्यातील गावागावांत साखळी उपोषण करण्यात येत असून राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. जिल्ह्यात भोकरदन येथे महिलांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला.
नांदेड येथे रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. आंदोलकांच्या भीतीपोटी प्रशासनाने रोजगार मेळाव्याचे ठिकाणच बदलले. डॉ. कराड कार्यक्रमासाठी गेल्याचे कळताच आंदोलकांनी रेल्वे प्रबंधक कार्यालय गाठून त्यांना रोखले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांनाही जाब विचारला. नांदेड येथे आज शनिवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेले पोस्टर आंदोलकांनी फाडले. मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांची आंदोलकांनी प्रतीकात्मक अंत्ययात्राही काढली.
हिंगोली जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी बसवर लावण्यात आलेल्या ‘गतिमान’ सरकारच्या जाहिरातीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या छायाचित्रांना काळे फासले. परभणी जिल्ह्यात अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. जिल्ह्यातील एका गावात विद्यार्थ्यांनी शाळेवर बहिष्कार टाकून मराठा आरक्षण आंदोलनात सहभाग नोंदवला.
बीड जिल्ह्यात शेकडो गावांत मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे. आंदोलकांनी राजकीय नेत्यांना गावात येण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यातील गेवराई येथील एका आंदोलकाने २५ कि.मी. लोटांगण घालत आंतरवाली सराटी गाठले आणि मनोज जरांगे यांची भेट घेतली. धाराशिव जिल्ह्यातही हीच परिस्थिती आहे. लातूर जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी मांजरा नदीपात्रात उड्या मारून अभिनव आंदोलन केले. लातूर दौर्यावर आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना मराठा आंदोलकांनी गावबंदी असताना आलाच कसे, असा जाब विचारला.
मराठवाड्यातील आंदोलने
छत्रपती संभाजीनगर – 540 गावे
जालना – 290 गावे
परभणी – 2250 गावे
हिंगोली – 250 गावे
बीड – 400 गावे
धाराशिव – 300 गावे
लातूर – 350 गावे
































































