
मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनाही जिल्हाबंदी करण्यात आली आहे. मात्र, आज सांगलीतून निघालेला पालकमंत्री खाडे यांचा ताफा मराठा आंदोलकांनी मिरजमधील वंटमुरे कॉर्नर येथे रोखला. खाडे त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली. खाडे यांचा ताफा अचानक अडविल्याने पोलिसांची तारांबळ उडाली.
राज्यकर्त्यांना गावोगावी बंदी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सार्वजनिक कार्यक्रम करायचा नाही. केल्यास उधळून लावू,’ असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांनी आज दुपारी मिरजेतील वंटमुरे कॉर्नर येथे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा ताफा रोखला. त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. तसेच मराठा आरक्षणाबाबत वेळोवेळी निवेदन देऊनही खाडे यांनी विधिमंडळात आवाज उठविला नसल्याचा निषेध करण्यात आला. तसेच खाडे यांना आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यास सांगून आरक्षणाचा अध्यादेश निघत नाही तोपर्यंत त्यांना जिल्हाबंदी करण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलासराव देसाई यांनी सांगितले. यावेळी संतोष माने, विजय धुमाळ, तानाजी भोसले, राजू चव्हाण, विक्रम पाटील, प्रशांत चव्हाण, अक्षय मिसाळ उपस्थित होते.
























































