
मराठा आरक्षण आणि जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज शिर्डीसह राहाता तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच राहाता तालुका सकल मराठा समाजाने शिर्डी येथे सुरू केलेल्या साखळी उपोषणास शिर्डीतील बहुजन समाजबांधवांनी पाठिंबा दिला. यामध्ये तेली, तांबोळी, साळी, माळी, मुस्लिम, आदिवासी, महार, न्हावी, मातंग, धनगर, वंजारी, परदेशी अशा विविध जाती-धर्मांचा समावेश आहे.
राजकीय नेत्यांना गावबंदी यानंतर आता ‘गावबंद’ची हाक देत मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्यात येत आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून राहाता तालुक्यासह ‘शिर्डी बंद’ची हाक देण्यात आली होती. शिर्डी शहरासह, राहाता तालुक्यात लोणी बुद्रूक व लोणी खुर्द येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठा आरक्षणासाठी सचिन चौगुले, अनिल बोठे, रवि गोंदकर, कानिफ गुंजाळ, नितीन कोते, प्रकाश गोंदकर, प्रशांत राहणे उपोषणास बसले आहे.
आज जामखेड बंद
मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण, महिलांचे उपोषण, कँडल मार्च काढण्यात आले. आता मराठ समाजातर्फे उद्या (दि. 31) ‘जामखेड बंद’ची हाक देण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
कोपर्डीत साखळी उपोषण
कोपर्डी येथे सकल मराठा समाज यांच्या वतीने साखळी उपोषण करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये ग्रामस्थांसह विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. जरांगे-पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोपर्डी येथे ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण केले. यावेळी आरक्षण दिल्याशिवाय आता माघार घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
उपोषणकर्त्यांचा उपचारास नकार
तालुक्यातील सोनेवाडी येथे आरक्षणासाठी किशोर जावळे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून, त्यांचा बीपी वाढला. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. त्यामुळे आरोग्य प्रशासनाची धांदल उडाली. संध्याकाळी उपोषणाच्या समर्थनार्थ गावातील तरुणांनी कँडल मार्च काढला. हजारो तरुणांनी या मार्चमध्ये सहभागी होत सरकारचा निषेध केला.
नारायण राणे, सदावर्ते यांच्याविरोधात संताप
महसूलमंत्री विखे-पाटलांच्या मतदारसंघात मराठा समाज आक्रमक झाला असून, एसटी बसवरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान यांच्या प्रतिमांना काळे फासण्यात आले. तसेच मराठा समाजाविषयी अपशब्द वापरल्याने नारायण राणे यांचा निषेध करण्यात आला. शिर्डीत आंदोलकांनी कोंबडीच्या गळ्यात नारायण राणे यांचे पोस्टर लावून निषेधाच्या घोषणा दिल्या. शिर्डीत सकल मराठा समाजाच्या वतीने गाढवांच्या गळ्यात गुणरत्ने सदावर्ते यांचे फोटो लटकवून निषेध करण्यात आला. सदावर्ते यांचे फोटो लटकवलेल्या गाढवांची शिर्डीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सदावर्ते यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
बुरुडगावच्या सरपंचासह सदस्यांचे राजीनामे
बुरुडगाव (ता. नगर) येथील लोकनियुक्त सरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पदाचे राजीनामे दिले, तर गावात कँडल मार्च काढून मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला. बुरुडगावचे सरपंच अर्चना कुलट यांच्यासह उपसरपंच महेश निमसे, सदस्य सिराज शेख, खंडू काळे, ज्योती कर्डिले, अक्षय चव्हाण, नैना दरंदले, शीतल ढमढेरे, रुक्मिणी जाधव, रंजना कुलट, दिलीप पाचरणे, शालन क्षेत्रे यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा सत्रानंतर संध्याकाळी निषेध सभा घेण्यात आली.




























































