मराठा ठोक मोर्चासाठी तगडा बंदोबस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ

परळी वैजनाथ या ठिकाणी ठोक मोर्चा काढून सरकारला जागे करण्यासाठी व मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी गनिमी कावा आंदोलन करण्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या वतिने ठरवण्यात आले आहे. मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या मराठा क्रांती ठोक मोर्चात सहभागी होणार आहेत. या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परळीत प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे.

बुधवारी होणाऱ्या मराठा ठोक मोर्चासाठी शहरात येणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. हा बदल फक्त मोर्च्याच्या दिवशी असणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून दिली गेली आहे. मोर्चासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात येणाऱ्या वाहनांची गैरसोय होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत तसेच शहरात तीन ठिकाणी वाहनतळाची सोय केलेली आहे.

कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कुठलीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आल्याची माहिती बीड जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे. तसेच सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असेही ते म्हणाले आहेत. या आंदोलनासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक – २,पोलीस उपअधीक्षक -६,पोलीस निरीक्षक- २०,पोलीस उपनिरीक्षक -९०,पोलीस कर्मचारी- ८००,राज्य राखीव पोलीस दल २ तुकड्या(२०० कर्मचारी),आर सी पी प्लाटून ३(७५ कर्मचारी) असा तगडा बंदोबस्त असणार आहे