
अवघ्या सिनेसृष्टीचे लक्ष लागलेल्या 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज नवी दिल्लीत झाली. यंदाच्या सोहळ्यात मराठी चित्रपटांची छाप पाहायला मिळाली. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘बार्डो’ने पटकावला असून याच चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी सावनी रवींद्र सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका ठरली आहे.
स्पेशल मेन्शन पुरस्कारांमध्ये ‘पिकासो’ आणि’ लता भगवान करे’ या चित्रपटांनी बाजी मारलीय तर ‘आनंदी गोपाळ’ने सामाजिक विषयांवरील चित्रपटासह सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईनसाठी पुरस्कारावर नाव कोरले आहे. ‘खिसा’ लघुपटाला बेस्ट डेब्यू नॉन फिचर फिल्म ऑफ अ डिरेक्टरसाठी तर मंदार कमलापूरकर यांना ‘त्रिज्या’साठी बेस्ट साऊंड डिझाईन जाहीर झाला आहे. याशिवाय ‘जक्कल’ सर्वोत्कृष्ट इन्वेस्टिगेटिव्ह चित्रपट तर ‘ताजमहल’ला राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलाय. अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा ‘छिछोरे’ हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. अशोक राणे यांच्या ‘सिनेमा पाहणारा माणूस’ला बेस्ट बुक स्पेशल मेन्शन पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोरोनाच्या सावटामुळे गेल्या वर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली नव्हती. यंदा तब्बल 461 फिचर फिल्म्स राष्ट्रीय पुरस्कारांच्या शर्यतीत होत्या. हे पुरस्कार केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱया चित्रपट महोत्सवसंचालनालयाकडून जाहीर होत असतात.
इतर पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अभिनेता – मनोज वाजपेयी (भोसले) आणि धनुष (असुरन), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना रनौत (मणिकर्णिका, पंगा), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजय सेतुपती (सुपर डिलक्स), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स), सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षकांची पसंती) – सोहिनी चट्टोपाध्याय, सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट – होली राईट्स, लाडली, सर्वोत्कृष्ट बालकलाकार – नागा विशाल (केडी – तमीळ), सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक – डी. इमान (विश्वासम), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – सुधांशू सरिया (नॉक नॉक नॉक), सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट – कस्तुरी (हिंदी), सर्वोत्कृष्ट गायक – बी प्राक (तेरी मिट्टी – केसरी), सर्वोत्कृष्ट संवाद – विवेक रंजन अग्निहोत्री (द ताश्कंद फाईल्स), सर्वोत्कृष्ट चित्रपटस्नेही राज्य – सिक्कीम, सर्वोत्कृष्ट पर्यावरणविषयक चित्रपट – द स्टॉर्क सेवियर्स
























































