
‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमधून रसिकांचा अतिशय लाडका बनलेला भाऊ कदम आता ‘चार्ली’ बनणार आहे. भाऊचे नवीन नाटक रंगमंचावर येणार आहे. स्वत: भाऊने गुढीपाडव्याच्या दिवशी ‘चार्ली’ नाटकाचे पोस्टर शेअर करून चाहत्यांना ही गोड बातमी दिली. ‘चार्ली’चे लेखक अरविंद जगताप असून महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन आहे. चार्लीच्या शीर्षक पोस्टरमध्ये चार्लीची हॅट आणि हातातील काठी दिसत आहे. त्यावरून नाटक विनोदी असेल असा अंदाज आहे. त्यामध्ये भाऊची भूमिका नेमकी काय आहे, याबाबत उत्सुकता आहे.
अद्वैत थिएटर आणि चंद्रलेखा या संस्था मिळून ‘चार्ली’ नाटकाची निर्मिती करत आहेत. राहुल भंडारे, तुषार सूर्यवंशी निर्माते आहेत. सध्या कोरोनामुळे नाटय़गृहे बंद आहेत. त्यामुळे नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग कधी होईल, हे आताच सांगता येणार नाही. सध्या ‘चार्ली’ नाटकाच्या स्क्रीप्टवर काम सुरू आहे.
अद्वैत थिएटरची 15 वर्षे
निर्माते राहुल भंडारे यांच्या अद्वैत थिएटर या संस्थेला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. मागील 15 वर्षांत संस्थेने 20 हून अधिक दर्जेदार नाटकं रंगभूमीला दिली आहेत. जागो मोहन प्यारे, करून गेलो गाव, शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला, टॉम अॅण्ड जेरी, ठष्ट, एकदा पहावं न करून, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, अलबत्या गलबत्या, निम्मा शिम्मा राक्षस आणि आरण्यक यांसारख्या अनेक दर्जेदार कलाकृती रसिकांना दिल्या आहेत. आता लवकरच संस्थेचे ‘चार्ली’ नाटक येतेय.


























































