न्या. सिक्री यांचे मत कोणी का विचारत नाही? मार्कंडेय काटजू यांचे फटकारे

16

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिपत्याखालील निवड समितीने सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यावरून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. वर्मा यांची हकालपट्टी करणाऱ्या समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. सिक्री हेसुद्धा होते. मग त्यांचे ‘मत’ जाणून घेण्याचा प्रयत्न कुण्या पत्रकाराने केला काय, असा सवाल करतानाच देशातला मीडिया म्हणजे फेकन्यूज आहे, असे फटकार माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी ‘ट्विटर’वरून लगावले आहेत.

पंतप्रधानांच्या अधिपत्याखालील निवड समितीने वर्मा यांची हकालपट्टी करून त्यांची होमगार्डस्, अग्निशमन सेवेत महासंचालक पदावर रवानगी केली होती. त्यावरून सरकारच्या यासंदर्भातील निर्णयावर नेटकऱयांनी सवाल उठवले आहेत.

सरकारचा कारभार असा कसा?
आलोक वर्मा हे भ्रष्ट आणि अपात्र होते, तर ते एका पदासाठी (होमगार्डस्) पात्र अन् दुसऱया पदासाठी (सीबीआय प्रमुख अपात्र ठरतात. भ्रष्टाचाराचे आरोप एकाच पदासाठी ग्राहय़ कसे धरले जातात, असा सवाल ‘ट्विटर’वर अनेक नेटकऱयांनी केला आहे. तर ‘पीएमओ’तून काही कामासाठी सरन्यायाधीशांना फोन गेला तर ते काम होईल किंवा नाही, असा सवाल सुनील मलिक यांनी विचारला आहे. सरकारचा कारभार असा कसा, असे लोक विचारू लागले आहेत.

अखेर काटजू यांनीच न्या. सिक्री यांना गाठले
आलोक वर्मा यांना सीबीआय प्रमुख पदावरून हटवणाऱया निवड समितीच्या बैठकीला सरन्यायाधीशांचे प्रतिनिधी म्हणून न्यायमूर्ती ए. के. सिक्री हे उपस्थित होते. त्यांचे मत पत्रकारांनी जाणून न घेतल्याबद्दल मीडियावर बरसलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी अखेर स्वतःच वर्मा प्रकरणात न्यायमूर्ती सिक्री यांचे मत जाणून घेतले. इतकेच नव्हे तर, वर्मा यांचे मत काटजू यांनी ‘ट्विटर’वर पोस्ट केले. प्रकरणाची सखोल चौकशी होऊन अंतिम निकाल लागून आलोक वर्मा यांचा दोष अथवा निरपराधित्व सिद्ध होईपर्यंत त्यांनी सीबीआयच्या संचालक पदावर राहू नये. त्यांची समान दर्जाच्या दुसऱया पदावर बदली करावी, असे न्यायमूर्ती सिक्री यांचे मत होते, असे काटजू यांनी ‘जगजाहीर’ केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या