जवान गणेश कसबे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लष्कराची कवायत सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने संगमनेर तालुक्यातील जवान गणेश देवराम कसबे (वय 34 ) यांचे निधन झाले आहे. आज संगमनेर तालुक्यातील ढोरवाडी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जवान गणेश कसबे हे राजस्थानमध्ये नसीराबाद येथे लष्करात सैनिक म्हणून कार्यरत होते. लष्कराची नेहमीची कवायत सुरू असताना कसबे यांना हृदयविकाराचा तीक्र धक्का बसल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ढोरवाडी येथे त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पठार परिसरातील आणि तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लष्कराच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून जवान गणेश कसबे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे उपस्थित होते.