ठसा – अजया जटार 

पुण्यातील सुभाषनगर शुक्रवार पेठ येथील गायिका अजया प्रभाकर जटार (पूर्वाश्रमीच्या विजया काशीनाथ पानसे) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी वयाच्या 7व्या वर्षांपासून त्यांचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण गोपाल गायन समाज, पुणे येथे पं. गोविंदराव देसाई यांच्याकडे आणि मुंबईत पं. मनोहर केतकर यांच्याकडे घेतले. त्यांचा जन्म पुण्यात 31 जुलै 1939 रोजी झाला. लहानपणापासूनच गायन, संगीताची त्यांना आवड होती. त्यांच्याकडे शास्त्रीय संगीतातील अनेक बंदिशींचा संग्रह होता. त्याचे सादरीकरण त्यांनी ‘भैरव ते भैरवी’ या कार्यक्रमाद्वारे केले होते. त्यांची व जटार कुटुंबीयांची मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘एमटूजीटू’ या कार्यक्रमात 2010मध्ये सादर झाली. त्यांनी दादर-माटुंगा सोशल क्लब, कामगार कल्याण केंद्र, श्री काशीविश्वेवर कीर्तन सेवा मंडळ, कऱहाडे सेवा मंडळ मुंबई, श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव, बजाज ऑटो कॉलनी वनिता मंडळ, उपाशी विठोबा मंदिर, कऱहाडे ब्राह्मण संघ, अभिज्ञान मंडळ, डी. ई. एस. सेपंडरी स्कूल पुणे, पुणे सार्वजनिक सभा, सुनील व अलका भगवान आयोजित गोकुळाष्टमी उत्सव कोल्हापूर, पुण्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये शास्त्र्ााrय व नाटय़ संगीताचे कार्यक्रम सादर केले होते. त्यांनी गायनाच्या अनेक स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले होते. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी गायनाचे व हार्मोनियम वादनाचे शिक्षण दिले होते. त्यांचा गेल्या काही काळापर्यंत गायनाचा नियमित रियाज सुरू होता. गायिका अजया जटार, लहान बाळांचे कपडे शिवण्यात, स्वेटर्स विणण्यात व पाककलेतही पारंगत होत्या. अनेक कलाकुसरीच्या वस्तूही छंद म्हणून साकारत असत. जिल्हा उद्योग केंद्र, पुणेतर्फे आयोजित 25 व्या अखिल भारतीय हस्तकला सप्ताहातील प्रदर्शनात त्यांना ‘वॉलहँगिंग, तोरण व फ्रेम्स’ या विभागात विशेष प्रशस्तीपत्रक मिळाले होते. त्यांचे हस्ताक्षरही सुरेख होते. त्यांनी ज्येष्ठ चित्रकार प्रा. अनंत भिडे यांच्या अनंतरंग आर्टस् फाऊंडेशनतर्फे आयोजित हस्ताक्षर शिबिरात झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. पॅम्लिन पंपनीतर्फे घेण्यात आलेल्या क्रायलिन पेंटिंग्जचा अभ्यासक्रमही त्यांनी ‘ए’ श्रेणी मिळवून पूर्ण केला होता. अजया जटार यांच्या पश्चात मुलगा तबलवादक व ‘संगीत मैफल’ या मासिकाचे संस्थापक – संपादक यशोधन, सून व्हायोलिनवादक उमा आहेत.

डॉ. सुहास परचुरे

आयुर्वेदिक आणि रुग्णसेवेचा तीन पिढय़ांचा वारसा डॉ. सुहास परचुरे यांना लाभला. आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णसेवा आणि आयुर्वेदाचे शिक्षण अशा स्वरूपात त्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. डॉ. सुहास परचुरे हे टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि पदव्युत्तर संचालक होते. राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ रुग्णालयाचे व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून ते कार्यरत होते. पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद आणि सिनेट सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे बोर्ड ऑफ स्टडीजचे अध्यक्ष, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे केंद्रीय अध्यक्ष, भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदेचे गव्हार्ंनग काwन्सिल सदस्य अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱया त्यांनी पार पाडल्या आहेत. आयुर्वेद रसशाळेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. केंद्र सरकारच्या आयुष विभागाने बुद्धय़ांक वाढवण्यासाठी राबवलेल्या शंखपुष्पी या टॉनिकच्या संशोधनातील प्रमुख संशोधक म्हणूनही त्यांचे योगदान आहे. ‘इंटिग्रेटेड मेडिसिन’ या विषयाबाबत त्यांना विशेष तळमळ होती. आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथी औषध वापराची परवानगी मिळावी याबाबत त्यांनी केंद्र सरकारपर्यंत पाठपुरावा केला होता. आयुर्वेद आणि रुग्णसेवेतील विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. वैद्य खडीवाले संस्था पुरस्कृत ‘महर्षी अण्णासाहेब पटवर्धन पुरस्कार’ तसेच राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या ‘जीवनगौरव’ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. विविध शाखांच्या महाविद्यालयांच्या उभारणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले असून आयुर्वेद क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्व आणि जगमित्र असा डॉ. परचुरे यांचा लौकिक आहे. डॉ. परचुरे यांचे ‘औषधे स्वयंपाकघरातील’ हे पुस्तक विशेष लोकप्रिय ठरले.

>> मेधा पालकर