ग्रंथालय बचाव समिती आक्रमक,लढेंगे… जितेंगे…मेधा पाटकर यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

महाराष्ट्राची ग्रंथसंपदा संपवण्याचा कट रचला जात असेल, तर लढावेच लागेल. आपण लोकशाही मार्गानेच लढणार आहोत. ग्रंथालय बंद पाडून येथे तर कोणी महाल उभारणार असाल तर ते चालू देणार नाही. हे ग्रंथालय वाचवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित लढले पाहिजे असे सांगत ‘लढेंगे जितेंगे’ अशी घोषणा सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली.

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या बचाव समितीतर्फे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सर्वसाधारण सभेचे आयोजन सोमवारी करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, पत्रकार हेमंत देसाई, माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे, विजय तापस आदी उपस्थित होते. या सभेत ग्रंथालय बचावासाठी ठराव मांडण्यात आले. हे ठराव 3 फेब्रुवारीला शरद पवार, सुप्रिया सुळे, यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येणार आहेत.

या सभेत नवीन कार्यकारिणीची नेमणूक करावी, संस्थेच्या कारभारात गैरव्यवहार झाला आहे याचा संशय येत असल्याने चौकशी समिती नेमण्यात यावी असा ठराव आज करण्यात आला. या समितीमध्ये विजय तापस, सुनील कर्णिक, डॉ. संजय मं. गो, भूषण प्रभू, ऍड. सुरेखा यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही समिती 30 दिवसात अहवाल सादर करणार आहे.