
सामना प्रतिनिधी । भंडारा
तुमसर शहरातील श्रीराम टॉकीजच्या समोर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी आरक्षित असलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून नगरपालिकेने त्या कडे दुर्लक्ष केले आहे. हे अतिक्रमण त्वरीत हटविण्यात यावे आणि प्रस्तावित जागेवरच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
तुमसर शिवसेनेच्या वतीने या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले आहे. सदर आरक्षित जागेचा भूमापन क्रमांक व ७/१२ देण्यात यावे, तसेच या जागेवरील अतिक्रमण हटवून डी. एल. आर व चतुर्थसिमा, मोजमाप सहित उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावे. जेणेकरून अनेक वर्षांपासून रखडलेला स्मारकाच्या विषय योग्य मार्गी लावण्यास सोयीचे होईल व तुमसर शहरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारक तयार करण्याचा मार्ग मोकळा होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री संजय राठोड, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, तहसीलदार गजेंद्र बालपांडे, भूमिअभिलेख अधिकारी सुखदेव खोडे, नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी अर्चना मेंढे तथा तुमसर शहराचे नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांना या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे. यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना शिवसेनेचे अमित एच. मेश्राम, उपजिल्हाप्रमुख जगदीश त्रिभुवनकर, तालुका अध्यक्ष गुड्डू डहरवाल, युवासेना तालुका अधिकारी संजू डाहाके, प्रवीण गायधने, शहर प्रमुख प्रवीण गुप्ता यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.





























































