
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
मर्सिडीज कार आणि दुधावर एकाच दराने कर कसा आकारायचा, असा सवाल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जीएसटी’खाली सरसकट समान कर आकारण्याची होत असलेली मागणी साफ धुडकावून लावली. त्याचवेळी काँग्रेसच्या मागणीप्रमाणे समान १८ टक्के कराची आकारणी झाली तर खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तूंवरील करात वाढ होईल, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला. जीएसटीला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने त्यांनी एका मासिकाला मुलाखत दिली.
वस्तू आणि सेवा करामुळे एका वर्षात अप्रत्यक्ष कराचे उत्पन्न ७० टक्क्यांनी वाढले. १७ कर आणि २३ उपकर हे एकाच करात विलीन करण्यात आले. त्यामुळे जकात नाके मोडीत निघाले, असे पंतप्रधानांनी सांगितले.
जीएसटीच्या करआकारणीची एकच श्रेणी असावी, असे बोलणे सोपे आहे. पण ते व्यवहार्य नाही. सध्या खाद्यपदार्थांवर शून्य ते ५ टक्के कर आहे. तो १८ टक्क्यांच्या समान आकारणीमुळे वाढेल या धोक्याकडे त्यांनी लक्ष वेधले.




























































