मेथीच्या दाण्यांचे सेवन केल्याने होतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी खाद्य संस्कृतीमध्ये मेथीचे दाणे व मेथीच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. डाळ, पराठा किंवा करी सारख्या सर्वच पदार्थांमध्ये मेथी वापरण्यात येते. मेथीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आढळतात. ज्याचा आरोग्यावर खुप चांगला फायदा होतो.

मेथी दाण्यांचा उपयोग वेगवेगळ्या अन्नपदार्थांमध्ये केला जातो. यामुळे जेवणाची चव वाढते. आयुर्वेदानुसार मेथीच्या दाण्यांमुळे कित्येक सौंदर्यवर्धक तसंच आरोग्यवर्धक लाभ मिळतात. मेथीचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे आपले आजारांपासून संरक्षण होतं. मेथीमध्ये जास्त प्रमाणात फॉलिक अ‍ॅसिडचे घटक आहेत.

मधुमेहींनी मेथीचे दाणे व मेथीची पाने या दोन्ही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. कारण मेथीमधील गॅलॉक्टोमेनिन या नैसर्गिक विद्रव्य फायबर घटकामुळे रक्तात साखर शोषण्याचे प्रमाण कमी होते. तसेच मेथीमधील अमिनो असिड या घटकामुळे इन्शुलिनच्या निर्मितीस देखील चालना मिळते.

तापामध्येही मेथीचे दाणे गुणकारी आहेत. लिंबू रस, मध आणि मेथीचे दाणे याचं मिश्रण तापावर उत्तम चाटण आहे. तसंच, यामध्ये असणाऱ्या ‘म्युसिलेज’ या घटकामुळे घशाच्या दुखण्यावर आराम मिळतो.

केसातील कोंडा कमी करण्यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी त्याची बारीक पेस्ट करा. हवं असल्यात यामध्ये दही मिसळा. हे मिश्रण तुमच्या टाळूवर घासा. हा पॅक तीस मिनिटं ठेवल्यानंतर केस स्वच्छ पाण्यानं धुवा.

वजन कमी करण्यासाठी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले मेथीचे दाणे सकाळी उपाशी पोटी चाऊन खा. मेथीमध्ये असलेल्या नैसर्गिक फायबरमुळे ते दाणे पोटात फुगतात ज्यामुळे भूक कमी लागते. ज्यामुळे सहाजिकच तुम्हाला वजन कमी करण्याचे ध्येय लवकर गाठता येते.

कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना संकेत यांनी ही माहिती दिली