म्हाडाच्या एनओसीशिवाय त्यांच्या जागेवर बेकायदेशीररीत्या उभ्या असलेल्या होर्डिंगविरोधात म्हाडाची धडक कारवाई सुरूच आहे. प्राधिकरणातर्फे गुरुवारी वर्सोवा येथील बेकायदेशीर होर्डिंग हटवण्यात आला. गेल्याच आठवडय़ात जुहूच्या शुभ जीवन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील 40 बाय 40 फुटाच्या होर्डिंगवर प्राधिकरणाने कारवाई केली होती.
घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी ‘म्हाडा’च्या भूखंडावर असलेल्या होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याचे तसेच बेकायदेशीर होर्डिंग तत्काळ हटवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱयांना दिले होते. त्यानुसार म्हाडातर्फे बेकायदेशीर होर्डिंगविरोधात सध्या धडक कारवाई सुरू आहे. गुरुवारी वर्सोव्यातील एमटीएनएल एसव्हीपी नगर येथील बेकायदेशीर होर्डिंग हटवण्यात आला असून म्हाडाने मुंबई महापालिकेच्या मदतीने ही कारवाई केली.
जाहिरात कंपन्यांचे धाबे दणाणले
म्हाडाने केलेल्या सर्वेक्षणात त्यांच्या जागेवरील 62 पैकी 60 होर्डिंगसाठी म्हाडाची एनओसी घेतली नसल्याचे आढळले होते. जागामालक म्हणून म्हाडाची एनओसी घेणे गरजेचे असतानाही पालिकेची परस्पर परवानगी घेऊन हे होर्डिंग उभारण्यात आले होते. संबंधित जाहिरात कंपन्यांना म्हाडाने नोटीस धाडली असून सदर बेकायदेशीर होर्डिंग स्वतःहून काढून घेण्याची सूचना केली आहे. जाहिरात कंपन्यांनी तसे न केल्यास पालिकेच्या मदतीने होर्डिंग निष्कासित करण्यात येणार असल्याचे म्हाडातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे संबंधित जाहिरात कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.