‘अश्वत्थामा’चे 100वे अभिवाचन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नमिता वारणकर

‘मी अश्वत्थामा बोलतोय’… या नाटकाने नुकताच 100 प्रयोगांचा टप्पा पार केला. शापित अश्वत्थाम्याचे आयुष्य उलगडून सांगणाऱया नाटकाच्या माध्यमातून श्रोत्यांना त्याचे चिरंजीवित्व उलगडत जाते. याचे सारे श्रेय ही कादंबरी लिहिणारे आणि त्यावर 21 वर्षे संशोधन करणारे लेखक, नाटककार अशोक समेळ यांचेच…अश्वत्थाम्याच्या जीवनातील प्रत्यक्ष नाटय़ वाचक आणि रसिकांसमोर आणण्यासाठी त्यांनी केलेला प्रवास…याबाबत त्यांच्याशी केलेली ही बातचीत…

तेलासाठी भीक मागणारा, भळभळणारी जखम घेऊन फिरणारा उपेक्षित अश्वत्थाम्याचं चिरंजीवित्व रसिक, वाचक यांना महाकादंबरीच्या अभिवाचनातून सादर करण्याचा मोठा टप्पा पार केला. याविषयी लेखक अशोक समेळ सांगतात, ‘मी अश्वत्थामा बोलतोय’ ही कादंबरी जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा एका महिन्यात 18 दिवसांत एक हजार पुस्तकांची पहिली आवृत्ती संपली. अश्वत्थाम्याविषयी बऱयाच जणांना खूपच कमी माहिती आहे. यासाठी मी आणि माझ्या पत्नीने अभिवाचन करायला सुरुवात केलीय. याचे अनेक प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी गेली दोन-तीन वर्षे आम्ही करत आहोत. चतुरंग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मोठमोठय़ा संस्थांनी आम्हाला त्यासाठी आमंत्रण दिलं. असे करत 100 प्रयोगांचा टप्पा पार केला यापुढेही हे प्रयोग होत राहतील. जवळजवळ एक ते दीड तास अभिनय करत आम्ही त्याचं वाचन करतं. ते झाल्यावर मी अश्वत्थामा आणि महाभारतावर बोलतो. लोकांशी संवाद साधतो. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो आणि अधिकाधिक वाचन करून स्वतःला श्रीमंत करून घ्या, असा त्यांना संदेश देतो.

अश्वत्थामा गेली पाच हजार वर्ष चिरंजीव आहे आणि तो फिरतोय. तो आता. नंदुरबारमध्ये अस्तंबा पर्वत जो सातपुडय़ातला पहिला पर्वत आहे. तिथे तो राहतो. कादंबरी वाचून अनेक वाचक तिथे गेले. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी तिथे यात्रा भरते. लाखो आदिवासी लोकांची अश्वत्थाम्यासाठी यात्रेला अस्तंबा पर्वतावर येतात. त्याचं अंतर 100 किलोमीटर आणि घाट 60 किलोमीटर आहे. त्या ठिकाणी चार दिवस राहून तेथील आदिवासींशी बोलून, अश्वत्थाम्याविषयीच्या आलेल्या अनुभूती जाणून घेतल्या, अशी माहिती ते देतात.

कादंबरीच्या संशोधनाच्या प्रवासाच्या आठवणी ते सांगतात, 21 वर्षे संशोधनासाठी हिमालय फिरलो. वसुंधरा नदीच्या काठावरील व्यासांचा आश्रम पाहिलाय. मेरठला कौरवांचं हस्तिनापूर पाहिलं, कुरुक्षेत्रावर गेलो जिकडे भिष्माचार्य शरपंजरीवर पडले होते. तिथे अर्जुनाने बाण मारून त्यांना पाणी दिलं, ते सरोवर तसेच जिथे दुर्योधन लपून बसला होता ते सरोवर आजही आहे. अश्वत्थामा फिरतच असतो. तो वाचकाला माझ्या कादंबरीत क्षणोक्षणी आढळेल. तो ब्लॅक कॅरेक्टर आहे. मी त्याला काही हिरो वगैरे काही केलेले नाही, पण ब्लॅक कॅरेक्टर पश्चात्ताप झाल्यावर सुधारू शकतो की नाही हा माझा एक फिक्शन म्हणून विचार आहे. शेवटी कृष्ण त्याला न्यायला येतो तेव्हा कृष्ण त्याला सांगतो, की अरे, तुला मी जो शाप दिला त्यापेक्षा दोन हजार वर्षे झाली. स्वर्गात चल. तो म्हणाला अरे, एकदा मी मनुष्य संहार केलाय. महाभारत संपवलंय. माझ्यापासून कलियुग सुरू झालंय. माझ्यावर जखमा आहेत. माझा नीलमणी अर्जुनाने काढून घेतला होता. त्यातून भळभळ वाहतेय रक्त आणि पूची त्यातून कलियुग सुरू झालंय. मला तू पुन्हा स्वर्गात घेऊन गेलास तर कलियुग संपेल आणि सगळी मनुष्यजात संपेल. पुन्हा तो माझ्यावर लागावा अशी माझी इच्छा नाही. त्यामुळे मी येत नाही. मनुष्य जात जेव्हा अतिशय वाईट अवस्थेत जाईल तेव्हा मी वर येईन. त्यामुळे आजही अश्वत्थामा चिरंजीव आहे. याची साक्ष या ग्रंथातून मिळेल.

वाचकांना आवाहन
कादंबरी लिहिताना काय जाणवलं असे विचारता ते सांगतात, त्याच्याविषयी लिहीत असताना तो सतत अवतीभवती वावरत असल्याचा भास होतो. आणि आताही जेव्हा अश्वत्थामा वेगळा लिहितोय तेव्हाही मला पूर्वीसारखाच अनुभव येत आहे. ही कादंबरी लिहिण्यासाठी महाभारत वाचलं. व्यासांच्या श्लोकांचं केलेलं भाषांतर, विष्णुपुराण वाचलं. बरेच ग्रंथवाचन केलं. प्रेक्षकांच्या प्रेमाचं यश मिळालं. मेहनतीचं चीज झालं. ही माझी प्रेक्षकांकडून एवढीच इच्छा होती की, वाचा तुमच्यापर्यंत मी अश्वत्थामा पोहोचवतोय.