शिरुर अनंतपाळमध्ये दुष्काळाचा दूध उत्पादनालाही फटका; दूध उत्पादनात मोठी घट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । शिरुर अनंतपाळ

तालुक्यातील दैठणा गावाचा मुख्य व्यवसाय दूधविक्रीचा असून येथील दूध लातूर जिल्ह्यात दररोज विक्रीला जाते. मात्र, यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे गावातील दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे. सध्या दररोज 400 ते 500 लिटर दुधाचे उत्पादन होते. हेच प्रमाण चार-सहा महिन्यांपूर्वी एक हजार ते 1200 लिटरच्या आसपास होते. या गावातील बरेच शेतकरी शेती साथ देत नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी व शेती व्यवसायाला जोड म्हणून मोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय करतात. मात्र, दुष्काळाची तीव्रता वाढल्यामुळे पशुखाद्याचे भाव दीडपटीने वाढले आहेत. तर चाऱ्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत पशुधन कसे सांभाळायचे असा पर्शन शेतकऱ्यांना पडला आहे.

राज्य शासनाकडून शिरूर अनंतपाळ तालुका दुष्काळी जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळी तालुका जाहीर करूनही सरकारने तालुक्यातील पशुधनासाठी कोणतीही योजना आखलेली नाही. यंदा तालुक्यात शासनाने चारा छावणी उभारणे अपेक्षित होते. मात्र, उन्हाळा संपत आला तरी येथील पशुधन वाचवण्यासाठी सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. यंदा पावसाचे आगमन लांबले आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर शिवारात पडक, धुरा आणि बंधाऱ्यावर चारा तयार होतो. त्याला अजून दीड महिना लागणार आहे. आता आणखी दीड महिना पशूधन सांभाळायचे कसे, त्यात खरीप पेरणीसाठीही शेतकऱ्यांचा मोठा खर्च होणार आहे. अशा परिस्थितीत पशुधन कसे सांभाळायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. चारा छावणी उभारणे शक्य नसेल तर चारा दावणीला द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चारा छावण्या उभारण्यात येतात. मात्र, मराठवाड्यामध्ये वारंवार दुष्काळ पडत असतानाही चारा छावण्या का उभारल्या जात नाहीत, असा सवाल शेतकरी करत आहेत. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी म्हैस, गायी यांना महागडा चारा कुठून पुरवायचा या आर्थिक अडचणीत शेतकरी सापडला आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या पशुधनांचा पशुवैद्यकीय विभागाकडून सर्वे करून पशुधन जगविण्यासाठी तात्काळ दावणीला चारा द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.