‘मिर्झापूर’ वेबसिरीज विरोधात महिला खासदाराने थोपटले दंड; पीएम मोदी, सीएम योगींकडे कारवाईची मागणी

प्रचंड गाजलेल्या ‘मिर्झापूर’ या वेबसिरीजचा दुसरा भाग नुकताच प्रसिद्ध झाला. उत्तर प्रदेशमधील गुन्हेगारीवर आधारित असणारी ही वेबसिरीज सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या वेबसिरीज विरोधात उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील एका महिला खासदाराने दंड थोपटले आहेत.

खासदार आणि अपना दल (एस) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अनुप्रिया पटेल यांनी ‘मिर्झापूर’ वेबसिरीजला विरोध केला आहे. या वेबसिरीजमुळे जिल्ह्याची बदनामी होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ट्विटरवर केली आहे.

मोदी-योगींना मदतीची साद

खासदार अनुप्रिया पटेल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग करून ‘मिर्झापूर’ वेबसिरीजवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वेबसिरीजच्या माध्यमातून ‘मिर्झापूर’ हिंसक भाग असल्याचे दाखवून बदनाम केले जात आहे. तसेच जाती-जातीत वाद वाढवला जात आहे, असा आरोप अनुप्रिया यांनी केला.

img_20201024_184020

22 ऑक्टोबरला रिलीज

दरम्यान, ‘मिर्झापूर’ वेबसिरीजचा दुसरा भाग 22 ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. आधी हा भाग 23 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार होता, मात्र काही तास आधी प्रदर्शित करून चाहत्यांना अचंबित करण्यात आले.

‘मिर्झापूर-2’ मध्ये दिव्येंदु शर्मा, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल आणि पंकज त्रिपाठी यासारख्या कलाकार असून गुरमीत सिंह आणि मिहिर देसाई यांनी ही वेबसिरीज दिग्दर्शित केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या