
सामना प्रतिनिधी । मुंबई
हजारो पुस्तके, ई-बुक, ई-जर्नल, मॅगझिन, अभ्यासक्रमाच्या पुस्तकांसह अवांतर वाचनाची दर्जेदार पुस्तके असलेली ‘हायटेक लायब्ररी’ विलेपार्लेच्या मिठीबाई कॉलेजमध्ये सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या लायब्ररीत विद्यार्थ्यांना पुस्तक घेणे आणि पुस्तक जमा करण्याची सुविधा मशीनवर उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होत आहे.
मिठीबाई कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘रुसा’च्या सहकार्याने प्राचार्य डॉ. राजपाल हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तक घेतल्यानंतर ते मशीनवर ठेवल्यास त्याची सर्व डिटेल्स मशीनवर अपलोड होऊन क्षणात त्याची पावती विद्यार्थ्यांना मिळते. तसेच पुस्तक जमा केल्यानंतरही मशीनवर पुस्तक जमा केल्यानंतर ताबडतोब त्याच्या सर्व डिटेल्सची पावतीही विद्यार्थ्यांना मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तक घेणे आणि देणे यासाठी रांगेत ताटकळत राहावे लागत नाही. 6900 स्केअर मीटर जागेवर तयार करण्यात आलेल्या या हायटेक लायब्ररीसाठी सुमोर 50 लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे डिटेल्स एका क्लिकवर
विद्यार्थ्यांच्या पुस्तक देवाणघेवाणीचे सर्व डिटेल्स ‘सॅप’ प्रणालीमध्ये इंटरनल लिंक केले असल्यामुळे वर्षभरात विद्यार्थ्यांनी किती पुस्तके घेतली, किती ई-जर्नल, ई-बुक घेतले याचा डाटा सेव्ह होतो. विद्यार्थ्याची ही माहिती एका क्लिकवर पाहता येते.
अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही ही हायटेक लायब्ररी सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान तर मिळेलच शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळणार आहे. ज्याचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यात सक्षम करीअर बनविण्यासाठी होणार आहे.
– डॉ. राजपाल हांडे, प्राचार्य, मिठीबाई कॉलेज
अशी आहेत वैशिष्टय़े
– या लायब्ररीत प्रोक्वेस्ट सेंट्रल डेटाबेसनुसार 1,58,928 पुस्तके, 11,143 स्कॉलरी जर्नल्स, 3016 टेड जर्नल्स, 2686 रिपोर्ट, 2112 न्यूज पेपर, 1297 मॅगझिन, 124 कॉन्फरन्स आणि माहितीचे अनेक स्रोत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
– लायब्ररीत आलेला विद्यार्थी घेतलेल्या पुस्तकाची एण्ट्री न करता बाहेर गेल्यास डिटेक्टर दरवाजात जाताच बझर वाजणार आहे. त्याचे सर्व डिटेल्स सिस्टमवर जमा होणार आहेत. त्यामुळे हेराफेरीलाही आळ बसणार आहे.
– या हायटेक लायब्ररीत अंध विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी बेल लिपीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
– मिठीबाई कॉलेज परिसरातील महाविद्यालयांतील विद्यार्थी-शिक्षकांनाही ई-जर्नल, ई-बुक उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे प्राचार्य हांडे यांनी सांगितले.
– लायब्ररीत 232 विद्यार्थी एका वेळी बसून अभ्यास करू शकतात.




























































